साताऱ्यात पोलीस पाटलांसाठी विशेष कार्यशाळा संपन्न
ग्रामीण भागातील गुन्हेगारी रोखण्यासाठी सतर्क रहावे - पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांचे आवाहन
सातारा (प्रतिनिधी) :- साताऱ्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने गावपातळीवर अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पोलीस पाटलांसाठी एका विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. १७ मार्च २०२६ रोजी सातारा येथील राधिका रोडवरील पोलीस वृंदावन मल्टीपर्पज हॉलमध्ये ही कार्यशाळा पार पडली.
सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत ही कार्यशाळा संपन्न झाली. याप्रसंगी मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षकांनी ग्रामीण भागात होणारी अमली पदार्थांची (ड्रग्ज) निर्मिती आणि त्यासंदर्भात पोलीस पाटलांनी घ्यावयाची काळजी यावर विशेष भर दिला. गावांमधील दुर्गम ठिकाणे, रिकामे शेड, बंद पडलेले कारखाने, ओसाड वस्त्या आणि गुरांचे गोठे अशा ठिकाणी संशयास्पद हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच केमिकलचा उग्र वास येणे, संशयास्पद व्यक्तींची वर्दळ असणे किंवा काचेची भांडी, प्लास्टिक पाईप आणि ड्रम यांसारख्या साहित्याची साठवणूक होणे याकडे लक्ष देऊन पोलीसांना तत्काळ माहिती देण्याचे आवाहन त्यांनी केले.
या कार्यशाळेत निवृत्त पोलीस उपअधीक्षक श्री. संभाजी पाटील आणि निवृत्त सहायक पोलीस उपनिरीक्षक श्री. वसंत साबळे यांनी पोलीस पाटलांना कायदेशीर बाबींचे सखोल मार्गदर्शन केले. यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र ग्राम पोलीस पाटील अधिनियम, फौजदारी प्रकरणांमध्ये पोलीस पाटलांनी करावयाची कार्यवाही आणि शासनाच्या विविध योजनांमधील त्यांची भूमिका यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्याचप्रमाणे तंटामुक्ती गाव मोहीम, दारूबंदी आणि गौण खनिज उत्खनन यांसारख्या विषयांवरही प्रकाश टाकण्यात आला. नागरिकांना दिले जाणारे दाखले आणि अहवालांची प्रक्रिया अधिक स्पष्ट आणि अचूक कशी असावी, याबद्दलही यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. भारतीय दंड संहितेमधील नवीन कलमांची माहिती देऊन पोलीस पाटलांच्या मनातील विविध शंकांचे व प्रश्नांचे यावेळी निरसन करण्यात आले. या यशस्वी कार्यशाळेचे नियोजन जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी चंद्रकांत जाधव, महिला पोलीस राधा जगताप, सागर खांडेकर व इतर अंमलदारांनी केले होते. ग्रामीण भागातील गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी पोलीस पाटलांनी अधिक सक्षमपणे काम करावे, असा सूर या कार्यशाळेतून उमटला.


Comments
Post a Comment