मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨

नेरळमध्ये भरवस्तीत सोनसाखळी चोरी

दुचाकीस्वाराने महिलेचे दीड लाखांचे दागिने लांबवले





कर्जत, दि. ३१ (प्रतिनिधी) :-  कर्जत तालुक्यातील नेरळ शहरात चोरीच्या घटनांचे सत्र सुरूच असून, एका धाडसी चोरीच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. रविवारी, दिनांक २९ मार्च २०२६ रोजी रात्री ९:५५ वाजेच्या सुमारास अंबिका नाका येथील एचडीएफसी बँकेच्या परिसरात रस्त्यातून पायी चालणाऱ्या एका महिलेचे दागिने दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्याने हिसकावून नेले. याप्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील फिर्यादी महिला ही घटनेच्या वेळी हेटकर आळी भागातून अंबीका नाका परिसराच्या दिशेने पायी चालत जात होती. त्या एचडीएफसी बँकेजवळ पोहोचल्या असता, पाठीमागून एका अज्ञात आरोपीने वेगाने मोटारसायकलवरून येऊन त्यांच्यावर झडप घातली. काही कळण्याच्या आतच चोरट्याने महिलेच्या गळ्यातील ५० हजार रुपये किमतीची सोन्याची चैन आणि १ लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र असा एकूण १ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून घेतला. दागिने हिसकावल्यानंतर आरोपीने दुचाकीवरून वेगाने पलायन केले.

​अचानक घडलेल्या या प्रकारामुळे फिर्यादी महिला भयभीत झाल्या होत्या. त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती नेरळ पोलीस ठाण्यात दिली. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०४(२) अन्वये गुन्हा रजिस्टर नंबर ६३/२०२६ नुसार नोंदवला आहे. भरवस्तीत आणि वर्दळीच्या ठिकाणी ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या गुन्ह्याचा पुढील अधिक तपास नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक काजरोळकर हे करत असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्याने आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

Comments

Popular posts from this blog