अहिल्यानगरच्या टोळीने नाशिकमध्ये घातला होता धुमाकूळ
स्थानिक गुन्हे शाखेकडून मुद्देमालासह आरोपी जेरबंद
नाशिक ग्रामीण पोलीसांची कारवाई
नाशिक वृत्त, दि. २९ (रणजीत मस्के) :- नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत कौशल्याने तपास चक्रे फिरवून पेठ आणि दिंडोरी पोलीस ठाणे हद्दीतील घरफोडी व शेतवस्तीवरील जबरी लुटमारीचे दोन गंभीर गुन्हे उघडकीस आणले आहेत. पेठ पोलीस ठाणे हद्दीतील विकाडी शिवारात २ डिसेंबर २०२५ रोजी रात्रीच्या सुमारास फिर्यादी श्रीमती मोरे यांच्या बंद घराच्या खिडकीचे गज वाकवून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण ६६,१०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे सुरगाणा तालुक्यातील माळगव्हाण येथील कमलेश लहानु चव्हाण (वय २२) आणि मानव डपाडा येथील दिगंबर भागवत कडाळी (वय २५) या दोन आरोपींना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी चोरीची कबुली दिली असून, त्यांच्याकडून चोरीचा मोबाईल आणि दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. या दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी पेठ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
दुसऱ्या एका महत्त्वपूर्ण कारवाईत दिंडोरी तालुक्यातील ढकांबे शिवारातील शेतवस्तीवर झालेल्या भीषण लुटमारीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. २३ मार्च २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास ढकांबे येथील श्री. धात्रक यांच्या घरी दरवाजाची कडी तोडून चार अज्ञात इसमांनी प्रवेश केला होता. आरोपींनी मनोहर धात्रक, सुरेश धात्रक आणि फिर्यादी महिलेला जीवघेण्या शस्त्रांचा धाक दाखवून व गंभीर जखमी करून अंगावरील दागिने आणि कपाटातील रोख रक्कम जबरदस्तीने पळवून नेली होती. या घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र मगर यांच्या पथकाने घटनास्थळावरील पुराव्यांचे विश्लेषण केले आणि पिंपळवाडी (ता. राहता) परिसरातून एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीतून बाबुशा चिंगळ्या काळे, शुभम चिंगळ्या काळे, रवि लाल्या भोसले, चेंग चिंगळया काळे, कबीर उम-या काळे, अक्षय उम-या काळे आणि सगड्या उमऱ्याया काळे (सर्व राहणार जिल्हा अहिल्यानगर) या सराईत गुन्हेगारांची नावे समोर आली.
विशेष म्हणजे, यातील बाबुशा काळे, शुभम काळे आणि रवि भोसले यांना अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले पोलीस ठाणे हद्दीत झालेल्या दरोड्याच्या गुन्ह्यात आधीच अटक करण्यात आली असून, मुख्य आरोपी बाबुशा काळे हा ओझर पोलीस ठाण्याच्या एका जबरी चोरीच्या गुन्ह्यातही फरार होता. हे सर्व आरोपी जबरी लुटमार, दरोडा आणि घरफोडीच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार असून, त्यांच्याकडून आणखीही अनेक गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र मगर, पोलीस उपनिरीक्षक हर्षल भोळे आणि त्यांच्या पथकातील अंमलदारांनी ही यशस्वी कामगिरी बजावली आहे.

Comments
Post a Comment