किहीममधून अल्पवयीन मुलीचे अपहरण
मांडवा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
अलिबाग, दि. २४ (प्रतिनिधी) :- मांडवा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील किहीम परिसरातून एका १५ वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मौजे किहीम येथील आदिवासी वाडीत राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्याने परिसरात खळबळ माजली आहे. ही घटना २१ मार्च २०२६ रोजी रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास घडली असून याप्रकरणी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आपल्या १५ वर्षे ११ महिने वयाच्या मुलीसह किहीम आदिवासी वाडी येथे वास्तव्यास आहे. शनिवारी रात्री सर्व कुटुंबीय घरी असताना, अज्ञात आरोपीने मुलीच्या अजाणतेपणाचा फायदा घेतला. संशयित आरोपीने या मुलीला कसले तरी आमिष दाखवून किंवा फूस लावून तिच्या राहत्या घरातून पळवून नेले. मुलगी घरात दिसून न आल्याने कुटुंबीयांनी तिची सर्वत्र शोधशोध केली, मात्र ती कोठेही मिळून आली नाही. अखेर आपली मुलगी बेपत्ता नसून तिचे अपहरण झाले असल्याची खात्री पटल्यानंतर पीडित मुलीच्या आईने मांडवा सागरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.
या तक्रारीची गंभीर दखल घेत मांडवा सागरी पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक २७/२०२६ नुसार, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १३७(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस हवालदार उज्ज्वला ठाकूर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. पोलीस सध्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक बाबींच्या आधारे आरोपीचा शोध घेत असून, लवकरच या प्रकरणाचा छडा लावला जाईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Comments
Post a Comment