मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 मुंबईत गुन्हा करून गोव्याच्या दिशेने पळणाऱ्या आरोपीला रायगड जिल्ह्यात अटक! गुन्हे अन्वेषण शाखा (LCB) आणि पोलादपूर पोलिसांची मुंबई-गोवा हायवेवर धाडसी कारवाई... 🚨

खालापूर पोलीसांची कौतुकास्पद कामगिरी

शोधलेले मोबाईल मूळ मालकांना केले सुपूर्द

खालापूर, दि. २९ (प्रतिनिधी) :- टेक्नॉलॉजीच्या युगात मोबाईल ही सर्वसामान्यांची अविभाज्य गरज बनली आहे, मात्र मोबाईल गहाळ झाल्यास त्यातील वैयक्तिक डेटा आणि आर्थिक नुकसानीमुळे नागरिक हवालदिल होतात. अशाच हवालदिल झालेल्या अनेक नागरिकांच्या चेहऱ्यावर खालापूर पोलीसांनी पुन्हा एकदा हसू फुलवले आहे. खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध ठिकाणांहून गहाळ झालेले आणि चोरीला गेलेले मोबाईल फोन शोधण्यात पोलिसांना मोठे यश आले असून, हे मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना सन्मानपूर्वक परत करण्यात आले आहेत.
भारत सरकारच्या 'सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर' अर्थात CEIR पोर्टलचा प्रभावी वापर करून खालापूर पोलिसांनी या मोहिमेत तांत्रिक कौशल्य दाखवले. या पोर्टलच्या मदतीने पोलिसांनी गहाळ झालेल्या मोबाईलचा माग काढला आणि ते यशस्वीरित्या हस्तगत केले. या हस्तगत केलेल्या मोबाईल संचांचे वाटप करण्यासाठी खालापूर पोलीस ठाण्यात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी खालापूर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. नेहूल यांच्या हस्ते संबंधित मोबाईल मालकांना त्यांचे फोन सुपूर्द करण्यात आले. आपला हरवलेला मोबाईल पुन्हा मिळेल अशी आशा सोडून दिलेल्या नागरिकांनी, फोन हातात मिळताच खालापूर पोलीस दल आणि श्री. नेहूल यांचे मनापासून आभार मानले.

यावेळी बोलताना श्री. नेहूल यांनी नागरिकांना आवाहन केले की, मोबाईल गहाळ झाल्यास त्वरित पोलीस ठाण्यात नोंद करावी आणि केंद्र सरकारच्या पोर्टलचा वापर करावा, जेणेकरून तांत्रिक मदतीने असे उपकरण शोधणे सोपे जाते. खालापूर पोलीसांनी राबवलेल्या या विशेष मोहिमेमुळे पोलीस दलाप्रती सर्वसामान्यांचा विश्वास अधिक वृद्धिंगत झाला असून, संपूर्ण परिसरात पोलीसांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.

Comments

Popular posts from this blog