मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
🚨 सातारा : पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी यांची तासगांव (जि. सांगली) येथून सातारा जिल्ह्यात बदली... 🚨 पुणे शहर वाहतूक विभागातर्फे मॉडीफाईड सायलेंसर असणाऱ्या बुलेट मोटारसायकल विरोधात मोहीम, ३४८ बुलेट मोटारसायकलवर कारवाई... 🚨 सोलापूर : खुळेवाडी, ता. माळशिरस येथे तळहातावर सुसाईड नोट लिहून नवविवाहितेची गळफास लावून आत्महत्या; पती, दिर, सासू, सासरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल... 🚨 जालना : आंतरराज्य घरफोडी करणारा कुख्यात गुंड रवी शिंदे पोलीसांच्या जाळ्यात...🚨 भंडारा : बाळ विक्री प्रकरण - ४ लाख ७० हजारांचा सौदा, डॉ. नितेश वाजपेयी यांच्यासह साथीदारांना अटक...🚨
अवघ्या ३० सेकंदात दुचाकी लंपास करणारा अट्टल चोर गजाआड; १३ मोटारसायकली जप्त

पुणे वृत्त (रणजीत मस्के) :- शहरात आणि आसपासच्या औद्योगिक वसाहतींमध्ये दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असतानाच, महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी एका मोठ्या कारवाईत यश मिळवले आहे. भरधाव वेगात दुचाकी चालवून चोरी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी आरोपीकडून तब्बल १३ चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या असून, या टोळीचा मुख्य सूत्रधार गजाआड करण्यात आला आहे.
​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाळुंगे एमआयडीसी परिसरातून सातत्याने दुचाकी चोरीला जात असल्याच्या तक्रारी येत होत्या. या अनुषंगाने पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास वेगाने सुरू केला. या दरम्यान पोलीस कर्मचारी शुभम खंडागळे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, दुचाकी चोरीतील संशयित आरोपी निलेश मंडलिक हा चाकण येथील आंबेठाण चौक परिसरात वास्तव्यास आहे.
​या माहितीची खातरजमा होताच, सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने त्वरित सापळा रचला आणि निलेश मंडलिक याला शिताफीने ताब्यात घेतले. अटकेनंतर केलेल्या कसून चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या दुचाकी आपणच चोरल्याचे त्याने मान्य केले. विशेष म्हणजे, आरोपी निलेश हा अत्यंत सराईत गुन्हेगार असून, तो केवळ ३० सेकंदात कोणत्याही दुचाकीचे हँडल लॉक तोडून गाडी पळवून नेत असे. या प्रकाराबद्दल नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी पोलिसांनी या चोरीच्या पद्धतीचा एक प्रात्यक्षिक व्हिडिओ देखील तयार केला आहे.
​या गुन्ह्यात निलेशला साथ देणारा त्याचा साथीदार संदीप सोनवणे यालाही पोलिसांनी अटक केली आहे. निलेश चोरी केलेल्या गाड्या संदीपला देत असे आणि संदीप त्या गाड्या मिळेल त्या किमतीत विकत असे. त्यानंतर आलेले पैसे दोघेही आपापसात वाटून घेत असत. या कारवाईत पोलिसांनी आरोपींकडून ५ लाख ५० हजार रुपये किमतीच्या एकूण १३ दुचाकी जप्त केल्या आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांनी या कारवाईची माहिती दिली असून, नागरिकांनी आपल्या दुचाकी सुरक्षित ठिकाणी किंवा अधिकृत पार्किंगमध्येच पार्क कराव्यात, असे आवाहन केले आहे.

Comments

Popular posts from this blog