मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 रिलायन्स नागोठणे कंपनीसमोर भरधाव कारच्या धडकेत मुंढाणीच्या तरुण कामगाराचा जागीच मृत्यू; सुरक्षा व्यवस्थेच्या ढिसाळपणाविरोधात नागरिकांचा संताप 🚨

श्रीरामपूर व श्रीगोंद्यात अवैध धंद्यांवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा

दारू व जुगार अड्ड्यांवर कारवाई करत सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त


​अहिल्यानगर, दि. १ (प्रतिनिधी) :- जिल्ह्यातील वाढत्या अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) श्रीरामपूर आणि श्रीगोंदा परिसरात जोरदार मोहीम राबवत धडक कारवाया केल्या आहेत. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिलेल्या कडक आदेशांनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी दोन स्वतंत्र पथकांची नियुक्ती केली होती. या पथकांनी श्रीरामपूर तालुका, श्रीरामपूर शहर आणि श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच दिवशी तीन ठिकाणी छापे टाकून दारू व जुगार चालविणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले असून, तब्बल १ लाख २४ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

​स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ३० ऑक्टोबर रोजी पहिली कारवाई श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माळवडगाव येथे केली. तेथे बेकायदेशीररीत्या गावठी दारू विक्री करणाऱ्या संजय बाबासाहेब खताळ (वय ४२, रा. माळवडगाव) याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याच्याकडून ८ हजार ८० रुपयांची दारू जप्त करण्यात आली. यानंतर दुसऱ्या पथकाने श्रीरामपूर शहरात सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर अचानक छापा मारला. या कारवाईत पोलिसांनी अजिज मिरन शेख (वय २६) आणि अभिजीत उत्तम गिरी (वय ३६, दोघे रा. वॉर्ड क्रमांक ४, श्रीरामपूर) या दोघांना रंगेहाथ ताब्यात घेतले, तर त्यांचा साथीदार रविंद्र बाळासाहेब चव्हाण हा पोलिसांची चाहूल लागताच फरार झाला. जुगाराच्या या अड्ड्यावरून पोलिसांनी रोख रकमेसह ८० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून, श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​तिसरी कारवाई श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुंढेकरवाडी येथे पार पडली. तेथे अवैध दारूचा साठा करून विक्री सुरू असल्याची माहिती मिळताच पथकाने छापा मारून कृष्णा बाळासाहेब मुंढेकर (वय ३९, रा. मुंढेकरवाडी) याच्याकडून ३६ हजार २८० रुपयांचा दारूचा साठा जप्त करत त्याच्याविरोधात दारूबंदी कायद्यान्वये कारवाई केली. एकाच दिवशी श्रीरामपूर आणि श्रीगोंदा परिसरात झालेल्या या धडक कारवायांमुळे अवैध धंदे चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या अंमलदारांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली असून, जिल्ह्यातील अवैध धंद्यांची पाळेमुळे खणून काढण्यासाठी यापुढेही अशीच धडक मोहीम सुरूच राहील, असा कडक इशारा पोलिसांनी दिला आहे.

Comments

Popular posts from this blog