अमली पदार्थांना नकार, सुरक्षित भविष्याचा स्वीकार!
रायगड पोलिसांचे नागरिकांना 'डायल ११२' वर माहिती देण्याचे आवाहन
रायगड, दि. ४ (प्रतिनिधी) :- समाजाला पोखरणाऱ्या अमली पदार्थांच्या विळख्यातून युवा पिढीचे रक्षण करण्यासाठी आणि भावी पिढीचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी रायगड जिल्हा पोलीस दल अधिक सतर्क झाले आहे. अमली पदार्थांच्या वाढत्या धोक्याची जाणीव करून देत रायगड पोलिसांनी नागरिकांमध्ये जनजागृती मोहीम हाती घेतली असून अमली पदार्थांना नकार देऊन सुरक्षित भविष्याचा स्वीकार करण्याचे आवाहन केले आहे. अमली पदार्थांचे सेवन केवळ एका व्यक्तीपुरते मर्यादित न राहता त्याचे गंभीर दुष्परिणाम संपूर्ण कुटुंब, नातेसंबंध आणि एकूणच समाजजीवनावर होतात, त्यामुळे या घातक व्यसनापासून सर्वांनी सुरक्षित अंतरावर राहावे, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
अमली पदार्थांचे व्यसन हे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरते. यामुळे शारीरिक व्याधी जडतातच, शिवाय मानसिक संतुलन ढासळून व्यक्ती नैराश्य, भीती आणि गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळू लागते. याशिवाय अमली पदार्थांची विक्री, खरेदी किंवा सेवन करणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर शिक्षेची तरतूद असून यामुळे अनेक तरुणांचे उज्ज्वल करिअर आणि आयुष्य उद्ध्वस्त होते. अनेकदा मित्र-मैत्रिणींच्या दबावाला किंवा तात्पुरत्या मौजमजेला बळी पडून तरुण वर्ग अशा मार्गाला लागतो, त्यामुळे अशा कोणत्याही दबावाला बळी न पडता स्वतःचे आरोग्य आणि भविष्य प्रथम स्थानी ठेवावे, असे पोलिसांनी नमूद केले आहे.
जिल्ह्यामध्ये कुठेही अमली पदार्थांची विक्री, साठा किंवा संशयास्पद हालचाली निदर्शनास आल्यास नागरिकांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे. यासाठी रायगड पोलिसांच्या वतीने आपत्कालीन मदत क्रमांक 'डायल ११२' वर त्वरित माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी दिलेल्या अशा माहितीमुळे वेळेत प्रतिबंधात्मक कारवाई करणे शक्य होणार असून अंमली पदार्थमुक्त समाज घडविण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांचे सहकार्य अत्यंत मोलाचे ठरेल, असा विश्वास 'सदैव सेवेसी तत्पर' असणाऱ्या रायगड पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे.

Comments
Post a Comment