माणगाव तालुक्यातील साई-खैरावाडी परिसरात समाजकंटकांकडून वणवा
मौल्यवान वनसंपत्तीसह गुरांचा चारा जळून खाक
वनविभागाने तातडीने जनजागृती करण्याची शेतकऱ्यांची मागणी
साई-माणगांव, दि. १ (उमेर सोलकर) :- माणगाव तालुक्यातील साई परिसरातील खैरावाडी येथे अज्ञात समाजकंटकांनी जंगलात वणवा लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या आगीत मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक वनसंपत्ती जळून खाक झाली असून निष्पाप वन्यजीवांनाही याचा मोठा फटका बसला आहे. आधीच पावसाच्या लहरीपणामुळे ग्रामीण भागातील शेतकरी वर्ग विविध संकटांचा सामना करत असताना, जंगलात जाणीवपूर्वक लावण्यात येणाऱ्या अशा वणव्यांमुळे गुरांच्या पाळीव चाऱ्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या प्रकारांना आळा घालण्यासाठी माणगाव वनविभागाने तातडीने प्रत्यक्ष फिल्डवर उतरून शेतकऱ्यांशी संवाद साधावा आणि व्यापक जनजागृती मोहीम राबवावी, अशी आक्रमक मागणी साई परिसरातील शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खैरावाडी परिसरातील डोंगरभागात काही अज्ञात इसमांनी जाणीवपूर्वक आग लावून दिल्याने काही वेळातच या वणव्याने रौद्ररूप धारण केले. डोंगरावरील सुके गवत आणि झाडेझुडपे आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने हिरवेगार डोंगर उघडेबोडके झाले आहेत. या आगीत अनेक दुर्मिळ वनस्पती, औषधी वनस्पती आणि निसर्गसंपदा जळून भस्मसात झाली आहे. तसेच आगीच्या तीव्र झळांमुळे जंगलातील लहान-मोठे वन्यजीव आणि पक्ष्यांची घरटी होरपळून नष्ट झाली असून, अन्नाच्या व पाण्याच्या शोधात असणारे मुके प्राणी सैरावैरा पळताना गंभीर संकटात सापडले आहेत.
सध्याच्या परिस्थितीत ग्रामीण भागात शेती पिकांचे नुकसान झालेले असताना गुराढोरांसाठी लागणारा वाळलेला नैसर्गिक चारा हेच शेतकऱ्यांचे मोठे भांडवल असते. मात्र, समाजकंटकांच्या अशा कृत्यांमुळे गुरांचा चारा मोठ्या प्रमाणावर जळून भस्मसात झाल्याने पशुपालकांसमोर जनावरांना काय खाऊ घालायचे, असा अत्यंत गंभीर पेच निर्माण झाला आहे. अशा घटना केवळ पर्यावरणाचा ऱ्हास करत नसून थेट शेतकऱ्यांच्या जगण्यावर आघात करत आहेत. त्यामुळे अशा प्रकारे जाणीवपूर्वक वणवा लावणाऱ्या समाजकंटकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक वनकायद्यानुसार गुन्हे दाखल करावेत, जंगलातील आगीच्या घटना रोखण्यासाठी वनविभागाने स्थानिक शेतकऱ्यांशी समन्वय साधावा आणि जनजागृतीपर उपाययोजना राबवून वणवे लावण्याचे प्रकार कायमस्वरूपी बंद करावेत, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Comments
Post a Comment