मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 रिलायन्स नागोठणे कंपनीसमोर भरधाव कारच्या धडकेत मुंढाणीच्या तरुण कामगाराचा जागीच मृत्यू; सुरक्षा व्यवस्थेच्या ढिसाळपणाविरोधात नागरिकांचा संताप 🚨

जागतिक रस्ता अपघातग्रस्त स्मृतिदिनानिमित्त कासू ब्रिज येथे श्रद्धांजली सभा व रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान

मुंबई–गोवा महामार्गावर वाहतूक नियमांच्या पालनाचा निर्धार


​पेण-रायगड (प्रतिनिधी) :- जागतिक रस्ता अपघातग्रस्त स्मृतिदिनानिमित्त 'सुजाण नागरिक फाउंडेशन'च्या वतीने मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील कासू ब्रिज येथे आयोजित करण्यात आलेली श्रद्धांजली सभा व रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान सामाजिक बांधिलकीच्या वातावरणात उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून रस्ता अपघातांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली, तसेच अपघातग्रस्त कुटुंबीयांच्या दुःखाप्रती संवेदना व्यक्त करत उपस्थित नागरिक आणि वाहनचालकांना रस्ता सुरक्षा व अपघात प्रतिबंधाबाबत मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले.

​या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महामार्ग वाहतूक शाखेचे (HSP वाकण) पोलीस उपनिरीक्षक दिनेश थळे, वडखळ पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार श्री. शिर्के आणि श्री. खाडे उपस्थित होते. उपस्थितांना मार्गदर्शन करताना वाहतूक नियमांचे महत्त्व पटवून देण्यात आले. रस्ते अपघात ही केवळ एखाद्या व्यक्तीची किंवा कुटुंबाची समस्या नसून ती संपूर्ण समाजाची गंभीर समस्या आहे. त्यामुळे प्रत्येक वाहनचालकाने हेल्मेट आणि सीटबेल्टचा वापर करणे, वेगमर्यादेचे भान ठेवणे, वाहन चालवताना मोबाईलचा वापर टाळणे तसेच मद्यपान करून वाहन न चालवणे यांसारख्या नियमांचे काटेकोर पालन करणे अत्यावश्यक असल्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. "अपघात झाल्यानंतर मदतीसाठी धावण्यापेक्षा अपघात होऊच नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अधिक महत्त्वाचे आहे," असा महत्त्वपूर्ण संदेश या अभियानातून देण्यात आला.

​या उपक्रमाचा मुख्य उद्देश केवळ अपघातग्रस्तांना श्रद्धांजली वाहणे एवढाच मर्यादित नसून, भविष्यात महामार्गावरील रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी नागरिक आणि प्रशासनाने एकत्रितपणे प्रयत्न करणे हा होता. रस्ता सुरक्षा ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक वाहनचालक, प्रवासी आणि नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे; प्रशासन आणि नागरिकांनी एकजुटीने काम केल्यास निश्चितच अपघातांचे प्रमाण रोखता येईल, असा ठाम विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला.

​या प्रसंगी सुजाण नागरिक फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष चैतन्य उषा लक्ष्मण पाटील यांच्यासह नंदकुमार जांभूळकर, सुरेखा तांडेल, चंद्रकांत पाटील, विनय तांडेल, प्रमोद तांडेल, स्थानिक विद्यार्थी, रिक्षा चालक तसेच विविध क्षेत्रांतील जागरूक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी "अपघातमुक्त, सुरक्षित आणि जबाबदार रस्त्यांसाठी प्रशासन आणि नागरिकांनी एकत्रितपणे पुढाकार घेऊया," असा संकल्प सुजाण नागरिक फाउंडेशनच्या वतीने करण्यात आला. फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले पोलीस अधिकारी, मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी आणि सर्व जागरूक नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

Comments

Popular posts from this blog