रायगड पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी
रस्त्यावर पडलेले साडेचार लाखांचे ११ लॅपटॉप संबंधितांना केले सुपूर्द
पाली-रायगड, दि. ४ (प्रतिनिधी) :- पाली-खोपोली मार्गावर गस्तीदरम्यान रस्त्यालगत सापडलेले तब्बल साडेचार लाख रुपये किमतीचे लॅपटॉप रायगड पोलिसांनी तात्काळ शोध घेऊन संबंधितांच्या स्वाधीन केले आहेत. पोलिसांच्या या प्रामाणिक व कर्तव्यदक्ष कामगिरीमुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जांभूळपाडा दूरक्षेत्र हद्दीमध्ये २ नोव्हेंबर रोजी पोलीस पथक पाली-खोपोली मार्गावर नेहमीप्रमाणे गस्त घालत होते. पेट्रोलिंग दरम्यान गोंदव फाटा परिसरामध्ये रस्त्याच्या कडेला पोलिसांना एक संशयास्पद पार्सल बॉक्स पडलेला दिसून आला. पोलिसांनी तात्काळ वाहन थांबवून त्या बॉक्सची पाहणी केली असता, त्यामध्ये एसर (Acer) कंपनीचे एकूण ११ मौल्यवान लॅपटॉप असल्याचे समोर आले. या सर्व लॅपटॉपची एकूण किंमत अंदाजे ४ लाख ५० हजार रुपये इतकी आहे.
त्यानंतर पोलिसांनी कोणताही विलंब न लावता सदर बॉक्सवर चिकटवलेल्या बिलाची व पत्त्याची बारकाईने तपासणी केली. त्या बिलावरील संपर्क क्रमांकावर फोन करून पोलिसांनी खात्री केली असता, कुरिअरच्या वाहनातून वाहतूक सुरू असताना हे पार्सल रस्त्यावर निसटून पडल्याचे स्पष्ट झाले. सर्व कायदेशीर बाबी आणि कागदपत्रांची पडताळणी पूर्ण केल्यानंतर पोलिसांनी संबंधित कुरिअर प्रतिनिधींना बोलावून सर्वच्या सर्व ११ लॅपटॉप सुरक्षितपणे त्यांच्या ताब्यात दिले. हरवलेला मौल्यवान ऐवज सुखरूप परत मिळाल्याने संबंधितांनी रायगड पोलिसांचे मनापासून आभार मानले असून, 'सदैव सेवेसी तत्पर' या ब्रीदवाक्याला जागत पोलिसांनी पुन्हा एकदा जनतेचा विश्वास संपादन केला आहे.

Comments
Post a Comment