रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण
अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल
खालापूर-रायगड, दि. ११ (प्रतिनिधी) :- खालापूर तालुक्यातील मोहोपाडा परिसरातील शिवनगर येथून एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी रसायनी पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस संबंधित मुलीचा कसून शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मौजे शिवनगर मोहोपाडा, ता. खालापूर येथील रहिवासी असलेल्या फिर्यादी यांची १६ वर्षे ३ महिने वयाची मुलगी घरात उपस्थित होती. दरम्यान, ९ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास, ती मुलगी अल्पवयीन आहे याची पूर्ण जाणीव असतानाही, अज्ञात आरोपीने तिच्या अजाणतेपणाचा गैरफायदा घेत तिला अज्ञात कारणासाठी कायदेशीर पालकांच्या रखवालीतून फूस लावून पळवून नेले. मुलगी घरातून अचानक दिसेनाशी झाल्याचे लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांनी आजूबाजूला, नातेवाईकांकडे तसेच परिसरात तिचा कसून शोध घेतला; मात्र तिचा कुठेही ठावठिकाणा लागला नाही.
अखेर मुलगी अल्पवयीन असल्याने तिचे अपहरण झाल्याची खात्री पटल्यानंतर मुलीच्या पालकांनी रसायनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. पालकांच्या तक्रारीवरून रसायनी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर १९८/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १३७(२) अन्वये अपहरणाचा गुन्हा नोंदवला आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ चिंता व खळबळ पसरली असून, रसायनी पोलीस या प्रकरणाचा वेगाने तपास करत आहेत. सदर प्रकरणाचा पुढील अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक ढोणे या करीत आहेत.

Comments
Post a Comment