मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 रिलायन्स नागोठणे कंपनीसमोर भरधाव कारच्या धडकेत मुंढाणीच्या तरुण कामगाराचा जागीच मृत्यू; सुरक्षा व्यवस्थेच्या ढिसाळपणाविरोधात नागरिकांचा संताप 🚨

मॅट्रिमोनियल साईटवर ओळख करून खोपोलीतील तरुणीला तब्बल ४२ लाखांचा गंडा

लग्नाचे आमिष दाखवून सायबर भामट्यांनी केली फसवणूक


खोपोली-रायगड, दि. ६ (प्रतिनिधी) :- मॅट्रिमोनियल साईटवरून ओळख करून, लग्न करण्याचे आमिष दाखवत खोपोली परिसरातील एका महिलेची तब्बल ४२ लाख ५९ हजार ५०० रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यूकेवरून महागड्या भेटवस्तू पाठविल्याचा बनाव रचून दिल्ली कस्टम अधिकाऱ्याच्या नावाने ही रक्कम उकळण्यात आली असून, याप्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात दोघांविरोधात विविध कलमान्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, काटरंग, खोपोली येथील स्तुती अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या तक्रारदार महिलेशी एका मराठी मॅट्रिमोनियल साईटच्या माध्यमातून आरोपीने संपर्क साधला होता. आरोपी क्रमांक एक याने आपण मूळचे युनायटेड किंगडम (यूके) येथे राहत असल्याचे भासवून बनावट प्रोफाईल तयार केले होते. त्याने तक्रारदार महिलेला मॅट्रिमोनियल साईटवर रिक्वेस्ट पाठवली. महिलेने ती रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर दोघांमध्ये संवाद सुरू झाला. हळूहळू आरोपीने महिलेचा विश्वास संपादन करून तिच्याशी लग्न करण्याचे आमिष दाखवले.

​मैत्री आणि लग्नाच्या जाळ्यात ओढल्यानंतर आरोपीने महिलेला यूके येथून तब्बल २० हजार पाऊंड (भारतीय चलनात सुमारे २५ लाख ३९ हजार २११ रुपये) तसेच मौल्यवान सोन्याचे दागिने, महागडे घड्याळ, हॅण्डबॅग, परफ्युम, आयफोन १८ प्रो मॅक्स, एअर पॉड्स, चॉकलेट्स आणि डायमंड ज्वेलरी असलेले एक पार्सल दिल्ली विमानतळावर पाठविल्याचा बनाव रचला. हे पार्सल दिल्ली येथे पोहोचल्याचे सांगून या सायबर टोळीतील दुसऱ्या महिला आरोपीने महिलेशी संपर्क साधला.

​आपण दिल्ली विमानतळावरील कस्टम विभागातील वरिष्ठ कस्टम अधिकारी असल्याचे सांगून आरोपी महिलेने खोटी ओळख दिली. यूकेवरून आलेले हे महागडे पार्सल ताब्यात घेण्यासाठी विविध शुल्कांची पूर्तता करावी लागेल, असा बनाव रचण्यात आला. यामध्ये पार्सल स्वीकारण्यासाठी ३५ हजार ५०० रुपये, रजिस्ट्रेशन फी म्हणून १ लाख २० हजार रुपये, कस्टम ड्युटीपोटी ४ लाख ५० हजार रुपये, कोर्ट परवानगी पत्रासाठी ७ लाख ६० हजार रुपये, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सहीसाठी ३ लाख ८४ हजार रुपये, कोर्ट आणि वकील फीपोटी १० लाख १० हजार रुपये तसेच डिक्लेरेशन व टॅक्स फीसाठी १५ लाख रुपये अशी वेळोवेळी मागणी करण्यात आली.

​पैसे भरण्यास टाळाटाळ केल्यास किंवा पैसे न दिल्यास यूकेतील संबंधित व्यक्तीला थेट तुरुंगात जावे लागेल, अशी भीती घालून तक्रारदार महिलेवर मानसिक दबाव टाकण्यात आला. या भीतीपोटी तक्रारदार महिलेने २८ सप्टेंबर २०२६ ते २३ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत वेगवेगळ्या पाच बँक खात्यांवर एकूण ४२ लाख ५९ हजार ५०० रुपये जमा केले. पैसे पाठवूनही पार्सल न मिळाल्याने आणि वारंवार अधिक पैशांची मागणी होत राहिल्याने आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले.

​या प्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात आरोपी क्रमांक एक व दोन यांच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक ३९२/२०२६ नुसार माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० (२००८ च्या सुधारणेसह) चे कलम ६६(डी) तसेच भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ चे कलम ३१८(४), ३१९(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील अधिक तपास खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे करीत आहेत.

Comments

Popular posts from this blog