कर्जत पोलिसांची धडक कारवाई
प्रतिबंधित अन्नपदार्थांची अवैध वाहतूक करणारी महागडी कार जप्त
कर्जत-रायगड, दि. ६ (प्रतिनिधी) :- शासनाने आरोग्यास घातक म्हणून बंदी घातलेल्या प्रतिबंधित अन्नपदार्थांची छुप्या पद्धतीने विक्री व वाहतूक करणाऱ्या समाजकंटकांविरोधात कर्जत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते विसर्जन घाट रोडदरम्यान ही कारवाई करण्यात आली असून, प्रतिबंधित अन्नपदार्थांचा मोठा साठा विक्रीसाठी घेऊन जाणारी एक चारचाकी गाडी पोलिसांनी रंगेहाथ पकडली आहे. या कारवाईमुळे अवैध सुगंधित तंबाखू, गुटखा व तत्सम प्रतिबंधित पदार्थांची तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कर्जत पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते विसर्जन घाट जाणाऱ्या रस्त्यावर संशयित हालचालींवर पोलिसांचे लक्ष होते. याच दरम्यान, चांदीच्या रंगाची (सिल्व्हर कलर) महिंद्रा एक्सयूव्ही ५०० (क्र. एम.एच. ०५ बी.सी. ८०५५) ही गाडी संशयास्पद रित्या जाताना पोलिसांच्या निदर्शनास आली. पोलिसांनी तात्काळ सापळा रचून सदर वाहनाची कसून तपासणी केली असता, गाडीमध्ये शासनाच्या राजपत्राद्वारे प्रतिबंधित करण्यात आलेला मोठा अन्नपदार्थ साठा अवैधरित्या लपवून वाहतूक केला जात असल्याचे स्पष्ट झाले. हा साठा विक्रीच्या उद्देशाने इतरत्र नेला जात होता. अन्न व सुरक्षा प्रशासनाच्या राजपत्रातील अधिसूचना क्र. असुमाअ/अधिसूचना/४११/२०२५/७ अन्वये अशा प्रकारच्या पदार्थांच्या साठवणुकीवर, वितरणावर आणि वाहतुकीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली असतानाही आरोपीने नफ्याच्या हव्यासापोटी हा बेकायदेशीर प्रकार केल्याचे उघड झाले.
पोलिसांनी घटनास्थळावरून प्रतिबंधित अन्नपदार्थ आणि गुन्ह्यात वापरलेली एक्सयूव्ही गाडी असा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ४३३/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३, २७४, २७५, १२३ सह अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६, नियम व नियमने २०११ चे कलम २६, २६ (१), २६ (२) (आय आय), २६ (२) (आयव्ही), तसेच २७ (३) (डी), २७ (३) (ई) सहवाचन कलम ३० (२) (ए) आणि ५९ अन्वये संबंधितावर कठोर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मानवी आरोग्याशी खेळणाऱ्या अशा तस्करांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला असून, या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे हे अत्यंत बारकाईने करीत आहेत.

Comments
Post a Comment