मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 रिलायन्स नागोठणे कंपनीसमोर भरधाव कारच्या धडकेत मुंढाणीच्या तरुण कामगाराचा जागीच मृत्यू; सुरक्षा व्यवस्थेच्या ढिसाळपणाविरोधात नागरिकांचा संताप 🚨

रिलायन्स नागोठणे कंपनीसमोर भरधाव कारच्या धडकेत मुंढाणीच्या तरुण कामगाराचा जागीच मृत्यू

सुरक्षा व्यवस्थेच्या ढिसाळपणाविरोधात नागरिकांचा संताप


​रोहा-रायगड, दि. १७ (प्रतिनिधी) :- नागोठणे हद्दीतील रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या मटेरियल गेटसमोरील रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात ड्युटीवर जाणाऱ्या तरुण कामगाराचा जागीच मृत्यू झाला आहे. पेण तालुक्यातील मुंढाणी (तरशेत) येथील रहिवासी मच्छिंद्र भिकाजी घासे (वय ३९) असे या दुर्दैवी मृताचे नाव असून, या घटनेने मुंढाणी गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मच्छिंद्र घासे हे आपल्या ॲक्टिव्हा स्कुटीवरून रिलायन्स कंपनीच्या मटेरियल गेटकडे ड्युटीवर जात असताना, मार्केटिंग बिल्डिंगसमोर मागून भरधाव वेगाने आलेल्या रेनो क्विड कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की मच्छिंद्र घासे यांचा जागीच मृत्यू झाला. मच्छिंद्र यांच्या पश्चात गर्भवती पत्नी, दोन भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे. जन्माला येण्याआधीच बाळाच्या डोक्यावरील पितृछत्र हरपल्याने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी फिर्यादी जनार्दन नारायण घासे (रा. मुंढाणी, ता. पेण) यांनी दिलेल्या तक्रारीवरून नागोठणे पोलीस ठाण्यात आरोपी कारचालक अमित राजकुमार सिंग (सध्या रा. गांधी चौक, नागोठणे) याच्याविरोधात बीएनएस कलम १०५, २८१, १२५(अ), १२५(ब) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे या घटनेचा पुढील तपास करीत आहेत.
​या अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि रिलायन्स कंपनीतील कामगारांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. रिलायन्स मटेरियल गेट ते शिहू या मार्गावर दररोज शेकडो अवजड वाहने ये-जा करतात, परंतु सुरक्षा व्यवस्थेच्या ढिसाळपणामुळेच असे अपघात घडत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे. स्थानिक कामगारांना गेटवर अडवून, ओळखपत्र आणि बॅगा तपासून त्रास देणाऱ्या आर.जी.एस.एस. (RGSS) सिक्युरिटीकडून परप्रांतीय नंबर असलेल्या वाहनांना आणि बाहेरून आलेल्या कंत्राटी ड्रायव्हरांना कोणतीही तपासणी न करता मोकळीक दिली जाते, असा दुजाभाव होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच, रिलायन्स कंपनीतील सुरक्षा अधिकारी केवळ स्थानिक कामगारांनाच हेल्मेट, सेफ्टी शूज आणि सेफ्टी बेल्टसाठी टोकून मेमो देत सुरक्षेचे धडे देतात, मात्र कंपनीत कंत्राटी पद्धतीवर असलेले आणि विशेषतः एल अँड टीशी संबंधित वाहनांचे ड्रायव्हर मद्यधुंद अवस्थेत असूनही त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते. मद्य पिऊन गाडी चालवणाऱ्या कंत्राटी ड्रायव्हरांची ब्रेथ ॲनालायझरने तपासणी व कारवाई केली जात नसल्याने ही दुहेरी भूमिका आता कामगारांच्या जीवावर बेतत असून, मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांमुळे हा मार्ग मृत्यूचा सापळा बनला असल्याची संतप्त प्रतिक्रिया कामगारांनी व्यक्त केली आहे.
​या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत कंपनीतील कामगार व स्थानिक नागरिकांनी कामगार सुरक्षा उपाययोजना योग्य रीतीने राबवण्यासह तातडीने ठोस पावले उचलण्याची मागणी केली आहे. यामध्ये मच्छिंद्र घासे यांच्या मृत्यूची सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषी ड्रायव्हर व संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, स्थानिकांप्रमाणेच परप्रांतीय वाहनांची व सर्व कंत्राटी ड्रायव्हरांची रोज कसून आणि सक्तीची मद्यपान तपासणी करावी, आर.जी.एस.एस. सिक्युरिटीच्या कामाची चौकशी करून स्थानिकांना त्रास देण्याचे थांबवावे, मटेरियल गेट ते शिहू मार्गावर वेगमर्यादा, ब्रेकर, सूचना फलक व सीसीटीव्ही तातडीने बसवावेत, कंपनीचे कर्मचारी ड्युटीवर येत असताना व बाहेर जात असताना एल अँड टी व रिलायन्स कंपनीतील अवजड वाहतूक थांबवून रस्त्यावर स्ट्रीट लाईट लावावी आणि मयत मच्छिंद्र घासे यांच्या गर्भवती पत्नी व कुटुंबाला कंपनीकडून तातडीने आर्थिक मदत व न्याय मिळवून द्यावा, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. आज मच्छिंद्र घासे यांचा जीव गेला, उद्या कोणाचा नंबर? प्रशासनाने आणखी किती बळींची वाट पाहायची? असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत.

Comments

Popular posts from this blog