मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 रिलायन्स नागोठणे कंपनीसमोर भरधाव कारच्या धडकेत मुंढाणीच्या तरुण कामगाराचा जागीच मृत्यू; सुरक्षा व्यवस्थेच्या ढिसाळपणाविरोधात नागरिकांचा संताप 🚨

विहिरीत उडी घेत मायलेकांची आत्महत्या

सुतारवाडीतील खिलारे फार्म हाऊसवरील धक्कादायक घटना


रोहा-रायगड, दि. ३ (प्रतिनिधी) :- रोहा तालुक्यातील सुतारवाडी नजीक असलेल्या एका खाजगी फार्म हाऊसवर सततच्या गंभीर आजारपणाला कंटाळून वृद्ध आई आणि तिच्या मुलाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची अत्यंत धक्कादायक व हृदयद्रावक घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली आहे. या दुर्देवी घटनेत मनीषा भगवान काशिकर (वय ८० वर्षे) आणि त्यांचा मुलगा मंदार काशिकर (वय ४३ वर्षे, मूळ रा. सर्वे नं. ७/८/९, पांडव सदन, लेन नं. शिवाजी नगर, पुणे; सध्या रा. खिल्लारे फार्म हाऊस, सुतारवाडी, पो. जामगाव, ता. रोहा) या मायलेकांचा जागीच मृत्यू झाला असून या घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.  

​मिळालेल्या माहितीनुसार, रोहा तालुक्यातील मौजे जामगाव हद्दीतील सुतारवाडी येथे अमित सुदाम खिल्लारे यांच्या मालकीचे फार्म हाऊस असून मयत मनीषा काशिकर व त्यांचा मुलगा या ठिकाणी राहत होते. शनिवार, दिनांक ३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ५.३० ते ९.३० च्या सुमारास फार्म हाऊस परिसरातील विहिरीच्या पाण्यात मनीषा काशिकर यांचा मृतदेह तरंगताना आढळून आला. दरम्यान, विहिरीच्या काठावर महिला व पुरुषाच्या चपला आढळून आल्याने महिलेचा मुलगा मंदार हादेखील विहिरीत पडला असावा अथवा त्यानेही उडी घेतली असावी असा संशय उपस्थित झाला. घटनेचे गांभीर्य ओळखून फार्म हाऊसवरील संतोष तुकाराम मार्कडे यांनी तत्काळ स्थानिक पोलिसांना या घटनेची माहिती दिली.  

​घटनेची माहिती मिळताच कोलाड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी महेश सानप यांच्या 'सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थे'च्या रेस्क्यू पथकाला पाचारण केले. रेस्क्यू पथकाने विहिरीच्या खोल पाण्यात शोधमोहीम राबवून सुरुवातीला तरंगत असलेला मनीषा काशिकर यांचा मृतदेह आणि त्यानंतर शोध घेऊन पाण्यात बुडालेला मंदार काशिकर यांचा मृतदेह सुखरूप बाहेर काढला. त्यानंतर दोघांचेही मृतदेह पुढील तपासणी व उपचारासाठी रोहा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोघांनाही तपासून मृत घोषित केले. प्राथमिक चौकशीत हे दोघेही मायलेक बऱ्याच काळापासून गंभीर आजारपणाने त्रस्त होते आणि सततच्या आजारपणातून आलेल्या तीव्र नैराश्यातूनच त्यांनी विहिरीत उडी घेऊन आपले जीवन संपवल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.  

​घटनेची भीषणता पाहता रोहा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. गोकुळे तसेच कोलाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत फार्णे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. रोहा उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले असून कोलाड पोलीस ठाण्यात बीएनएसएस कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील सखोल तपास कोलाड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस. जी. भोजकर हे करीत आहेत.

Comments

Popular posts from this blog