मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 रिलायन्स नागोठणे कंपनीसमोर भरधाव कारच्या धडकेत मुंढाणीच्या तरुण कामगाराचा जागीच मृत्यू; सुरक्षा व्यवस्थेच्या ढिसाळपणाविरोधात नागरिकांचा संताप 🚨

सुकेळी ॲट्रॉसिटी प्रकरणातील 'त्या' तथाकथित महाराजाभोवती वैज्ञानिक पुराव्यांचा फास आवळला

आवाजाचे नमुने घेण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मदत

आरोपीच्या अडचणीत प्रचंड वाढ!


​रोहा-रायगड, दि. १० (विशेष प्रतिनिधी) :- रोहा तालुक्यातील सुकेळी येथे लहान मुलांच्या किरकोळ वादातून एका असहाय्य आदिवासी समाजातील महिलेला बेदम मारहाण करून भररस्त्यात जातीवाचक हीन पातळीवर शिवीगाळ केल्याप्रकरणी नागोठणे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या ॲट्रॉसिटी गुन्ह्याच्या तपासाने आता अत्यंत वेगवान आणि वैज्ञानिक वळण घेतले आहे. स्वतःला वारकरी 'महाराज' म्हणवून घेणाऱ्या मुख्य आरोपी जितेंद्र चंद्रकांत धामणसेसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर, पोलिसांनी या गुन्ह्यातील डिजिटल पुरावे भक्कम करण्यासाठी थेट वैज्ञानिक तपास सुरू केला आहे. या घटनेच्या वेळी रेकॉर्ड करण्यात आलेल्या ऑडिओ क्लिपची सत्यता पडताळण्यासाठी मुख्य आरोपी जितेंद्र धामणसे आणि फिर्यादी यांचे आवाजाचे नमुने (Voice Samples) घेण्याची अधिकृत कायदेशीर प्रक्रिया हाती घेण्यात आली असून, यासाठी पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB), रायगड-अलिबाग यांच्याकडे रीतसर पत्रव्यवहार करण्यात आला आहे. या कायदेशीर आणि फॉरेन्सिक नाकेबंदीमुळे तथाकथित महाराजासह इतर आरोपींच्या अडचणीत आता प्रचंड वाढ झाली आहे.  

​सुकेळी येथील रहिवासी असलेल्या २३ वर्षीय फिर्यादी महिला कामावरून घरी परतल्यानंतर, त्यांच्या साडेतीन वर्षांच्या लहान मुलाला खेळताना झालेल्या मारहाणीबाबत विचारणा करण्यास गेल्या असता हा वाद उद्भवला होता. त्यावेळी गळ्यात तुळशीची माळ घालून वारकऱ्यांचा आव आणणाऱ्या जितेंद्र चंद्रकांत धामणसे याने या वादात उडी घेत महिलेस दमदाटी सुरू केली. 'आमच्या बायकांच्या भांडणात पडू नका' असे फिर्यादीने म्हटल्याचा राग मनात धरून, तथाकथित महाराज जितेंद्र याने घरातून धावून येत फिर्यादी महिलेची मान पकडून बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांनीही महिलेवर हात उचलला. ग्रामस्थांनी वाद सोडवल्यानंतरही आरोपींनी फिर्यादीच्या घरासमोर येत अत्यंत विकृत शब्दांत जातीवाचक विधाने करत जीवे मारण्याची धमकी दिली होती.  

​या प्रकरणी नागोठणे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवही क्रमांक १८८/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (ॲट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्ह्यात फिर्यादी महिलेने घटनेच्या वेळचे ऑडिओ रेकॉर्डिंग पेनड्राईव्हद्वारे पुरावा म्हणून पोलिसांकडे सुपूर्द केले होते. आता हा पुरावा न्यायालयात १०० टक्के सिद्ध करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी, रोहा विभाग प्रसाद गोकुळे यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अधिकृत समजपत्र जारी केले आहे. गुन्ह्यातील आरोपी जितेंद्र चंद्रकांत धामणसे आणि फिर्यादी यांचे आवाजाचे नमुने घेण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या विशेष तांत्रिक यंत्रणेमार्फत नागोठणे पोलीस ठाण्यात ही प्रक्रिया पूर्ण केली जात आहे.  

​कायद्याच्या दृष्टीने ही कारवाई अत्यंत निर्णायक मानली जात आहे. आवाजाचे नमुने घेऊन ते फॉरेन्सिक लॅबच्या व्हॉईस स्पेक्ट्रोग्राफी चाचणीसाठी पाठवले जाणार असल्याने, "ऑडिओ क्लिपमधील आवाज माझा नाही" असा खोटा बचाव आरोपीला भविष्यात कोणत्याही न्यायालयात करता येणार नाही. आधीच माणगाव सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धडपडणाऱ्या आरोपीची या वैज्ञानिक तपासामुळे पूर्णपणे कायदेशीर कोंडी झाली आहे. एकीकडे पीडितेचा न्यायालयात नोंदवलेला लेखी जबाब, प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब आणि दुसरीकडे ही फॉरेन्सिक पुराव्यांची भक्कम साखळी यामुळे आरोपींना कोणत्याही क्षणी बेड्या ठोकल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे वारी आणि संतांच्या नावाखाली समाजात वावरणाऱ्या या विकृत प्रवृत्तीच्या तथाकथित महाराजाचे धाबे पुरते दणाणले आहेत.

Comments

Popular posts from this blog