राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्यात रायगड पोलीस दलाचे नाव उज्ज्वल
पोलीस हवालदार एस. के. पाटील यांना कांस्यपदक
रायगड, दि. ८ (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र पोलीस महासंचालक कार्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या २१ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा २०२६ मध्ये रायगड जिल्हा पोलीस दलातील पोलीस हवालदार एस. के. पाटील यांनी उत्तुंग कामगिरीचे प्रदर्शन करत कांस्यपदक पटकावले आहे. राज्य पातळीवरील अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या या स्पर्धेत त्यांनी मिळवलेल्या घवघवीत यशामुळे संपूर्ण रायगड जिल्हा पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, रायगड पोलीस दलाचे नाव संपूर्ण राज्यात अभिमानाने झळकले आहे.
या २१ व्या राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्यात गुन्हे अन्वेषण आणि तांत्रिक कौशल्याशी संबंधित 'सायंटिफिक एड टू इन्व्हेस्टिगेशन' (Scientific Aid to Investigation) या विभागात अनेक चुरशीच्या चाचण्या घेण्यात आल्या. यामध्ये अत्यंत महत्त्वाची व गुंतागुंतीची मानली जाणारी 'ऑब्झर्वेशन टेस्ट' (Observation Test) ही उपस्पर्धा पार पडली. या उपस्पर्धेत पोलीस हवालदार एस. के. पाटील यांनी कोकण परिक्षेत्राचे प्रभावी प्रतिनिधित्व केले. घटनास्थळावरील पुरावे गोळा करणे, घटनाक्रमाचे सूक्ष्म व अचूक निरीक्षण करणे आणि शास्त्रीय पुराव्यांची योग्य सांगड घालणे या सर्व आघाड्यांवर त्यांनी उत्कृष्ट निरीक्षण कौशल्याचे सादरीकरण केले. राज्यभरातील विविध पोलीस आयुक्त कार्यालये व परिक्षेत्रांतून आलेल्या अत्यंत कुशल अंमलदारांमधून त्यांनी चुरशीच्या स्पर्धेत आपले वेगळेपण सिद्ध करत तृतीय क्रमांकाचे कांस्यपदक आपल्या नावे केले.
आधुनिक पोलीस तपास पद्धतीमध्ये गुन्ह्यांचा शास्त्रीय आणि तांत्रिक आधारावर छडा लावण्यासाठी ही चाचणी अत्यंत मोलाची समजली जाते. श्री. पाटील यांनी दाखवलेल्या या सूक्ष्म कौशल्यामुळे गुन्हे तपासातील रायगड पोलिसांची व्यावसायिकता आणि सक्षमता राज्य पातळीवर पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. त्यांच्या या उत्तुंग यशाबद्दल रायगडच्या पोलीस अधीक्षक आँचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे, तसेच वरिष्ठ अधिकारी यांनी एस. के. पाटील यांचे विशेष अभिनंदन करून त्यांच्या कौशल्याची प्रशंसा केली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले व पुढील सेवेसाठी तसेच आगामी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.


Comments
Post a Comment