मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 रिलायन्स नागोठणे कंपनीसमोर भरधाव कारच्या धडकेत मुंढाणीच्या तरुण कामगाराचा जागीच मृत्यू; सुरक्षा व्यवस्थेच्या ढिसाळपणाविरोधात नागरिकांचा संताप 🚨

ऊस वाहतूक सुरक्षिततेसाठी सातारा पोलिसांचा पुढाकार

रहिमतपूर व उंब्रज पोलिसांकडून विशेष जनजागृती मोहीम


​रहिमतपूर-सातारा, दि. २९ (प्रतिनिधी) :- जिल्ह्यात साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होताच रस्त्यांवर उसाच्या वाहतुकीला वेग आला असून, या पार्श्वभूमीवर अपघात टाळण्यासाठी सातारा जिल्हा पोलिसांनी विशेष पुढाकार घेतला आहे. ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे संभाव्य धोके आणि अपघात रोखण्याच्या उद्देशाने रहिमतपूर तसेच उंब्रज पोलीस ठाण्यांच्या वतीने व्यापक जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत रस्त्यावरून धावणाऱ्या ऊस वाहतूकदारांना वाहतुकीचे नियम पाळण्याचे आणि वाहनांना रिफ्लेक्टर लावण्याचे आवाहन करण्यात येत आहे.









​या जनजागृती मोहिमेअंतर्गत रहिमतपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जयपूर येथील शिवनेरी शुगर मिल परिसरात तसेच मुख्य मार्गांवर गस्त घालून ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर व ट्रॉली चालकांशी थेट संवाद साधण्यात आला. रात्रीच्या वेळी अथवा पहाटेच्या धुक्यात रस्त्यावरून जाणाऱ्या उसाच्या ट्रॉली चालकांना स्पष्ट न दिसल्यामुळे अनेकदा भीषण अपघात घडतात. हा धोका टाळण्यासाठी ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या पुढील तसेच मागील बाजूस योग्य प्रकारे रिफ्लेक्टर लावणे अत्यंत बंधनकारक असल्याचे चालकांना समजावून सांगण्यात आले. यासोबतच चालकांनी रस्त्यावरून जाताना वाहतुकीच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करावे, वाहनाची गती मर्यादित ठेवावी, क्षमतेपेक्षा अधिक ऊस भरू नये आणि ओव्हरटेक करताना योग्य ती खबरदारी घ्यावी, अशा महत्त्वपूर्ण सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या.



​दरम्यान, केवळ जनजागृतीवरच न थांबता ज्या वाहनांवर रिफ्लेक्टर लावलेले नाहीत किंवा सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन केले जात आहे, अशा वाहनांवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश संबंधित वाहतूक नियंत्रण अंमलदारांना देण्यात आले आहेत. सुरक्षित ऊस वाहतुकीसाठी पोलिसांनी सुरू केलेल्या या उपक्रमाचे साखर कारखाना प्रशासन आणि परिसरातील वाहनचालकांकडून स्वागत होत असून, चालकांनीही स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठी सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog