‘पोलीस दीदीची माया, बालसुरक्षेचा विश्वास’
नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने रायगड पोलिसांचा ‘गुड टच – बॅड टच’ जनजागृती उपक्रम
रायगड, दि. १५ (प्रतिनिधी) :- शक्ती आणि आदिशक्तीच्या उपासनेचा सण असलेल्या नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून रायगड जिल्हा पोलिसांनी बालसुरक्षेसाठी एक कौतुकास्पद आणि अत्यंत महत्त्वाचा सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे. ‘पोलीस दीदीची माया, बालसुरक्षेचा विश्वास’ या संकल्पनेवर आधारित मोहिमेद्वारे चिमुरड्यांना सुरक्षिततेचा कानमंत्र दिला जात असून, लहान मुलांना ‘गुड टच’ आणि ‘बॅड टच’ यातील सूक्ष्म व महत्त्वाचा फरक समजावून सांगण्यावर भर दिला जात आहे. बदलत्या सामाजिक वातावरणात बालकांवरील लैंगिक अत्याचार आणि अनुचित वर्तनाला आळा घालण्यासाठी रायगड पोलिसांची ‘पोलीस दीदी’ थेट शाळांमध्ये पोहोचून विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहे.
या विशेष जनजागृती मोहिमेंतर्गत पोलीस अधिकारी व अंमलदार वर्ग प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये जाऊन अतिशय सोप्या आणि सहज भाषेत विद्यार्थ्यांना शरीराची सुरक्षितता समजावून सांगत आहेत. मायेने जवळ घेणे, पालकांनी कौतुकाने पाठीवर हात फिरवणे किंवा वैद्यकीय तपासणीदरम्यान पालकांच्या उपस्थितीत डॉक्टरांनी केलेली तपासणी हा ‘चांगला स्पर्श’ कसा ठरतो, हे विद्यार्थ्यांना चित्रांच्या आणि संवादाच्या माध्यमातून शिकवले जात आहे. त्याचबरोबर कोणाकडूनही अयोग्य किंवा अस्वस्थ वाटणारा स्पर्श झाल्यास, शरीराच्या खाजगी भागांना कोणी हात लावण्याचा प्रयत्न केल्यास अथवा त्याबद्दल कुणाला न सांगण्याची धमकी किंवा गुप्त ठेवण्याची सक्ती केली जात असल्यास तो ‘वाईट स्पर्श’ म्हणजेच ‘बॅड टच’ असल्याचे स्पष्टपणे पटवून दिले जात आहे.
अशा प्रसंगी बालकांनी अजिबात न घाबरता अथवा शांत न राहता तात्काळ आपल्या आई-वडिलांना, शिक्षकांना किंवा घरातील विश्वासू मोठ्या व्यक्तींना स्पष्टपणे कल्पना दिली पाहिजे, असा आत्मविश्वास या वेळी पोलीस दीदीकडून विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केला जात आहे. मुलांनी आपल्या मनातील भीती बाजूला ठेवून तत्काळ मदत मागितल्यास अनेक अनुचित प्रकार वेळीच रोखता येणे शक्य होणार आहे.
बालसुरक्षा ही केवळ पोलिसांची किंवा पालकांची नसून संपूर्ण समाजाची एक सामूहिक जबाबदारी असल्याचे आवाहन या निमित्ताने रायगड जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे. समाजात घडणाऱ्या विकृत घटनांपासून आपल्या भावी पिढीचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येक पालकाने आपल्या पाल्याशी मोकळेपणाने संवाद साधायला हवा, तसेच त्यांच्या वर्तनातील बदलांवर बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे आहे. नवरात्रीच्या पवित्र पर्वात बालकांच्या सुरक्षेचा जागर घडवून आणत ‘जनसेवेत सदैव तत्पर’ या आपल्या ब्रीदवाक्याला जागत रायगड पोलिसांनी राबविलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून जोरदार स्वागत आणि कौतुक होत आहे.

Comments
Post a Comment