मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 रिलायन्स नागोठणे कंपनीसमोर भरधाव कारच्या धडकेत मुंढाणीच्या तरुण कामगाराचा जागीच मृत्यू; सुरक्षा व्यवस्थेच्या ढिसाळपणाविरोधात नागरिकांचा संताप 🚨

पोयनाड पोलिसांची धडक कारवाई

घरफोडी करणाऱ्या चोरट्याला ठोकल्या बेड्या; १ लाखाची रोकड हस्तगत


​पोयनाड-रायगड, दि. ७ (प्रतिनिधी) :- पोयनाड परिसरातील एका बंद घरात घुसून कपाट आणि बॅगेतील रोख रक्कम लंपास करणाऱ्या सराईत चोरट्याला जेरबंद करण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीकडून चोरीला गेलेल्या रकमेपैकी तब्बल एक लाख रुपयांची रोख रक्कम हस्तगत केली असून, या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तक्रारदाराच्या घरात अज्ञात चोरट्याने बेकायदेशीररीत्या प्रवेश केला होता. त्यानंतर घरातील कपाट आणि बॅगेची उचकापाचक करून त्यामध्ये ठेवलेली १ लाख ५ हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली होती. ही बाब निदर्शनास येताच तक्रारदाराने तातडीने पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार दिनांक ०२ ऑक्टोबर २०२६ रोजी पोयनाड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला होता.

​गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी परिसरातील संशयितांची चौकशी, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या आधारे वेगाने तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांच्या पथकाने अत्यंत कौशल्याने सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने या घरफोडीची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीकडून चोरीला गेलेल्या रकमेपैकी एक लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली असून, त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले आहे. या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच आरोपीने अशा प्रकारचे अन्य काही गुन्हे केले आहेत का, या दिशेने पोलीस पुढील सखोल तपास करत आहेत.

Comments

Popular posts from this blog