नागोठणेत जागेच्या वादातून दाम्पत्यास जातीवाचक शिवीगाळ व स्टम्पने बेदम मारहाण
पाच जणांवर ॲट्रॉसिटीसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल
बेणसे-रायगड, दि. २७ (चंद्रकांत अडसुळे) :- खाजगी मालकीच्या जागेत अनधिकृतपणे पत्र्याचे शेड उभारण्यास विरोध केल्याच्या कारणावरून एका दलित दाम्पत्यास धक्काबुक्की करत जातीवाचक शिवीगाळ करणे तसेच घरात घुसून स्टम्पने मारहाण करत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची गंभीर घटना रोहा तालुक्यातील रमाई नगर, नागोठणे येथे घडली आहे. या प्रकरणी पीडिताच्या तक्रारीवरून नागोठणे पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) सुधारणा अधिनियम २०१५ सह भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शक कार्यप्रणालीनुसार (एसओपी) या प्रकरणात कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रमाई नगर, नागोठणे येथील रहिवासी विजय धर्मा शिर्के (वय ४०) यांच्या मालकीच्या जागेवर आरोपी सागर राजेंद्र राणे, संतिष राजेंद्र राणे आणि संगिता राजेंद्र राणे यांनी कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता अनधिकृतपणे पत्र्याचे शेड बांधण्यासाठी साहित्य आणून ठेवले होते. १८ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९:३० ते सायंकाळी ४:०० वाजेच्या दरम्यान विजय शिर्के व त्यांच्या पत्नी सौ. मोनिका शिर्के यांनी या बेकायदेशीर कामाबाबत विचारणा केली असता, आरोपींनी संताप व्यक्त करत दोघांनाही जबरदस्तीने धक्काबुक्की केली. एवढ्यावरच न थांबता, 'तू महार आहेस, तुझी जातच नालायक आहे, आमच्या नादी लागू नकोस' अशा विखारी शब्दांत भररस्त्यात जातीवाचक शिवीगाळ करून त्यांचा जाहीर अपमान केला. त्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास विजय शिर्के हे आपल्या घरात असताना, सागर राणे, संतिष राणे, संगिता राणे यांच्यासह कुणाल यशवंत कांबळे आणि राजेश्वरी यशवंत कांबळे यांनी आपसात संगनमत करून शिर्के यांच्या घरात प्रवेश केला व पुन्हा शिवीगाळ करत त्यांना लाकडी स्टम्पने बेदम मारहाण करून जीवे ठार मारण्याची थेट धमकी दिली.
या जीवघेण्या हल्ल्यानंतर विजय शिर्के यांनी नागोठणे पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी सागर राणे, संतिष राणे, संगिता राणे, कुणाल कांबळे व राजेश्वरी कांबळे यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११८, १८९(२), १९१(२), १९१(३), १९० सह अ.जा.अ.ज. (अत्याचार प्रतिबंधक) कायद्याचे कलम ३(१)(r)(s), ३(२)(v)(a) अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक २१२/२०२६ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, तपासादरम्यान २४ ऑक्टोबर रोजी वाढीव कलमांची नोंद केली आहे. या गुन्ह्याचा तपास नागोठणे पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक राजहंस नागदिवे करत असून, नागरी हक्क संरक्षण पथक अलिबागचे सहायक पोलीस निरीक्षक संजय भोसले यांनीही प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.
दरम्यान, रायगड जिल्ह्यामध्ये ॲट्रॉसिटी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठी मा. जिल्हाधिकारी रायगड यांनी ६ फेब्रुवारी २०२५ रोजी ४७ मुद्द्यांची विशेष कार्यप्रणाली (एसओपी) जाहीर केलेली आहे. या एसओपीतील मुद्दा क्रमांक १६ नुसार, ॲट्रॉसिटी हा विशेष कायदा असल्याने कलम १८-ए अन्वये कोणतीही प्राथमिक चौकशी न करता थेट दखलपात्र गुन्हा नोंदवून सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्याचे स्पष्ट निर्देश आहेत. याशिवाय पीडित व साक्षीदारांना खटला संपेपर्यंत कलम १५-ए नुसार विनामूल्य पोलीस संरक्षण देणे, संपूर्ण कारवाईचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे, दोषारोपपत्राची प्रत मोफत देणे, आरोपींची स्थावर व जंगम मालमत्ता जप्त करण्यासाठी न्यायालयात अहवाल पाठवणे आणि तपासी अधिकाऱ्याला इतर बंदोबस्ताची कामे न देणे असे अत्यंत कडक नियम प्रशासनाने घालून दिले आहेत. या सर्व कायदेशीर तरतुदींच्या अधीन राहून पोलीस प्रशासन या गुन्ह्यात पुढील कठोर कायदेशीर कारवाई करत आहे.

Comments
Post a Comment