धाटाव एमआयडीसीत टँकरच्या धडकेत तरूणाचा मृत्यू
दारूच्या नशेत निष्काळजीपणे टँकर चालविल्याचा चालकावर आरोप!
अपघातानंतर पळून जाण्याचा प्रयत्न
रोहा-रायगड, दि. ६ (प्रतिनिधी) :- रोहा तालुक्यातील धाटाव एमआयडीसी परिसरातील बारसोली रस्त्यावर दारूच्या नशेत निष्काळजीपणे आणि बेदरकारपणे टँकर चालवून एका व्यक्तीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात टँकरचालकाविरोधात गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ४ ऑक्टोबर रोजी रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास धाटाव एमआयडीसीतील सुदर्शन केमिकल कंपनीच्या मागील बाजूस असलेल्या बारसोली गावाकडे जाणाऱ्या वळणावर हा भीषण अपघात घडला. मूळचा राजस्थान येथील रहिवासी असलेला टँकरचालक सोहनलाल कानिया मिना (वय ३४) याने दारू पिऊन आपल्या ताब्यातील टँकर (क्रमांक आर.जे. ५८/जी.ए. ०१४१) रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून अत्यंत निष्काळजीपणे व हयगयीने मागे (रिव्हर्स) घेतला. त्यावेळी रस्त्याने जात असलेले अजय सुभाष सरकार (मूळ रा. पश्चिम बंगाल, सध्या रा. धाटाव, ता. रोहा) यांना टँकरने जोराची धडक दिली. या अपघातात अजय सरकार हे गंभीर जखमी झाले आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
अपघात घडल्यानंतर जखमी व्यक्तीला कोणतीही मदत न करता अथवा घटनेची माहिती पोलिसांना न देता टँकरचालक घटनास्थळावरून पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. मात्र, परिसरातील दक्ष नागरिकांनी प्रसंगावधान राखून पळ काढणाऱ्या चालकाला पाठलाग करून जागीच पकडून ठेवले. या अपघाताबाबत रवींद्र फुलचंद पटेल (वय ३२, सध्या रा. धाटाव, रोहा) यांनी रोहा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चालक सोहनलाल मिना याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०६ (१), २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटर वाहन कायद्यातील कलम १३४, १८५ व १८७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभय शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार आशुतोष म्हात्रे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Comments
Post a Comment