स्वतंत्र भारतात इंग्रजांच्या काळापेक्षा अधिक दलित हत्या!
वाढत्या अत्याचारांवरून वैभव गीते यांचा सरकारवर घणाघात
बेणसे-रायगड, दि. ८ (चंद्रकांत अडसुळे) :- देश इंग्रजांच्या गुलामगिरीत असताना जेवढ्या हत्या झाल्या नाहीत, त्यापेक्षा अधिक दलित हत्या स्वतंत्र भारतात झाल्या असून महाराष्ट्रात दररोज दलितांवर अत्याचार होत असताना शासन मात्र गुन्हेगारांना पाठीशी घालत आहे, असा संतप्त आरोप सामाजिक कार्यकर्ते वैभव गीते यांनी केला आहे. चाळीसगाव तालुक्यातील लोजी येथे एका बौद्ध कुटुंबावर झालेल्या भीषण सशस्त्र हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर ते बोलत होते.
अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींवरील अत्याचार रोखण्यासाठी कडक कायदे, विशेष न्यायालये आणि पुनर्वसनाच्या तरतुदी असतानाही गुन्हेगार मोकाट फिरत आहेत. नागोठण्याजवळील सुकेली येथील घटना असो वा इतर प्रकरणे, शासकीय अधिकारी अजूनही राजकीय दबावाखालीच काम करत असल्याचे वास्तव समोर येत असून या सर्व गंभीर बाबींवर लवकरच मंत्रालयीन बैठकीत जाब विचारणार असल्याचे गीते यांनी स्पष्ट केले.
लोजी येथे घडलेल्या भ्याड हल्ल्यात एका निरपराध बौद्ध व्यक्तीचा जीव गेला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिक पोलीस पाटील हा आरोपींचा जवळचा नातेवाईक असून त्यानेच या हल्ल्याला खतपाणी घातल्याचा थेट आरोप पीडित कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे त्या पोलीस पाटलालाही या गुन्ह्यात तत्काळ सहआरोपी करण्यात यावे.
मागील महिन्यात सोलापूर जिल्ह्यातील शेटफळ येथील सिद्धेश्वर मंदिरात गेलेल्या भीमनगरमधील बौद्ध नागरिकांना अमानुष मारहाण करून रक्तबंबाळ करण्यात आले होते. पाठोपाठ घडलेल्या या घटनांमुळे ग्रामीण भागातील बौद्ध वस्त्या पूर्णपणे असुरक्षित झाल्या असून राज्यात सामूहिक हल्ल्यांची शृंखलाच सुरू झाली आहे. या संपूर्ण प्रकरणात चाळीसगाव पोलिसांची अक्षम्य निष्क्रियता दिसून येत असल्याने संबंधित पोलीस निरीक्षकाला तातडीने निलंबित केले पाहिजे. हा भाग आमदार मंगेश चव्हाण यांच्या मतदारसंघात येत असल्याने त्यांनी यात स्वतः लक्ष घालावे.
राज्यात कायद्याचे धिंडवडे निघत असल्याने गृहमंत्र्यांनी या प्रकरणाची थेट दखल घेऊन सर्व मारेकऱ्यांना तात्काळ बेड्या ठोकाव्यात, हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून गुन्हेगारांना फाशीची शिक्षा द्यावी आणि पीडित कुटुंबाला त्वरित पोलीस संरक्षण व आर्थिक साहाय्य पुरवावे, अशी जोरदार मागणी आता जोर धरत आहे.

Comments
Post a Comment