सेवा संकल्प अभियानांतर्गत गोरेगावात आदिवासी समाजासाठी शिकाऊ वाहनचालक अनुज्ञप्ती शिबिर संपन्न
६० नागरिकांनी घेतला लाभ
गोरेगाव-रायगड, दि. २३ (प्रतिनिधी) :- शासकीय योजना व सेवा थेट तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण आणि गोरेगाव पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने गोरेगाव येथे आदिवासी समाजातील नागरिकांसाठी विशेष शिकाऊ वाहनचालक अनुज्ञप्ती (लर्निंग लायसन्स) शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या विशेष शिबिराला स्थानिक आदिवासी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून एकूण ६० उमेदवारांनी यामध्ये आपला सहभाग नोंदवून या सुविधेचा लाभ घेतला.
आदिवासी समाजातील नागरिकांना वाहन चालविण्याचा अधिकृत परवाना मिळविताना येणाऱ्या अडचणी दूर करणे, परवाना मिळविण्याची संपूर्ण प्रक्रिया सुलभ करून देणे, नियमांचे अचूक मार्गदर्शन करणे तसेच शासकीय सेवांचा थेट लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. हे संपूर्ण शिबिर उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सिद्धार्थ ठोके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. शिबिरादरम्यान उपस्थित अधिकाऱ्यांनी उमेदवारांना वाहन चालविताना पाळावयाचे वाहतुकीचे नियम, सुरक्षिततेची मानके आणि शिकाऊ अनुज्ञप्तीसाठीच्या संपूर्ण संगणकीय व कायदेशीर प्रक्रियेची सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले.
या लोककल्याणकारी उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मोटार वाहन निरीक्षक दीपक ठाकूर, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक मंगेश चौधरी, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक स्वप्नील ससाणे तसेच वाहनचालक प्रवीण गाडे यांनी सक्रिय सहभाग घेत नियोजनबद्ध कामकाज पाहिले. याशिवाय गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर जाधव हे शिबिरादरम्यान उपस्थित होते. पोलीस विभागाच्या मोलाच्या सहकार्यामुळे संपूर्ण शिबिराचे नियोजन अतिशय सुरळीत पार पडले. परिवहन विभाग आणि गोरेगाव पोलीस यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे आदिवासी समाजातील गरजू घटकांना घरपोच सेवेचा अनुभव आला असून, अशा प्रकारच्या लोकहितैषी उपक्रमाबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.

Comments
Post a Comment