आंबिवली आदिवासी वाडी येथून ३२ वर्षीय तरुण बेपत्ता!
अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी कोलाड पोलिसांत गुन्हा दाखल
रोहा-रायगड, दि. ३० (किरण मोरे) :- रोहा तालुक्यातील आंबिवली आदिवासीवाडी येथील ३२ वर्षीय तरुण मंगेश दत्ता वाळेकर हे संशयास्पदरीत्या बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. कोणा अज्ञात इसमाने त्यांना काहीतरी आमिष दाखवून अथवा फूस लावून पळवून नेल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने दाखल केली असून, याप्रकरणी कोलाड पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, मूळचे सुधागड तालुक्यातील नांदगाव खैराटवाडी येथील रहिवासी असलेले मंगेश दत्ता वाळेकर (वय ३२ वर्षे) हे सध्या रोहा तालुक्यातील कुडली पोस्ट हद्दीतील आंबिवली आदिवासीवाडी येथे वास्तव्यास होते. दिनांक २० ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास ते अचानक घरातून निघून गेले. बराच वेळ उलटूनही ते परत न आल्याने नातेवाईकांनी सर्वत्र शोधाशोध केली, मात्र त्यांचा काहीही थांगपत्ता लागला नाही. अखेर कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्यांना फूस लावून पळवून नेल्याचा संशय बळावल्याने त्यांच्या पत्नी सरिता मंगेश वाळेकर यांनी कोलाड पोलीस ठाण्यात धाव घेऊन रीतसर फिर्याद नोंदवली.
या फिर्यादीवरून कोलाड पोलिसांनी अज्ञात इसमाविरोधात गुन्हा रजिस्टर क्रमांक १४३/२०२६ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. बेपत्ता मंगेश वाळेकर यांचे वर्णन पाहिले असता, त्यांचे वय ३२ वर्षे असून रंग सावळा, चेहरा गोल आणि चेहऱ्यावर बारीक दाढी आहे. बेपत्ता झाले त्या दिवशी त्यांच्या अंगात निळ्या रंगाचा शर्ट व फिकट निळ्या रंगाची पँट होती. या तरुणाला पळवून नेण्यामागचे कारण काय, यामागे नेमका कोणाचा हात आहे आणि संबंधित व्यक्ती सध्या कुठे आहे, याचा कसून शोध पोलीस घेत आहेत.
या प्रकरणाचा पुढील तपास कोलाड पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार एस. बी. मेरगळ हे करत असून, वरील वर्णनाशी मिळत्याजुळत्या व्यक्तीबाबत कोणाला काहीही माहिती अथवा सुगावा लागल्यास त्यांनी तात्काळ कोलाड पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments
Post a Comment