गंभीर गुन्ह्यानंतरही सुकेळी येथील ॲट्रॉसिटी प्रकरणातील तथाकथित 'महाराज' अद्याप मोकाट!
आरोपी मोकाट राहिल्यास सामाजिक शांतता धोक्यात येण्याची भीती, तातडीने अटकेची मागणी
रोहा-रायगड, दि. २ (विशेष प्रतिनिधी) :- रोहा तालुक्यातील सुकेळी येथे एका महिलेला मारहाण करून भररस्त्यात जातीवाचक हीन पातळीवर शिवीगाळ केल्याप्रकरणी नागोठणे पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक (ॲट्रॉसिटी) कायद्यान्वये गुन्हा दाखल होऊनही मुख्य आरोपी जितेंद्र चंद्रकांत धामणसे अद्याप मोकाटच आहे. नित्यनेमाने वारी आणि हरिपाठाचा आव आणून परिसरात 'महाराज' म्हणून वावरणाऱ्या या व्यक्तीचा हा हिंसक चेहरा उघडकीस आल्यानंतर सर्वच स्तरांतून संताप व्यक्त होत आहे. "वारकरी कसा असावा आणि कसा नसावा?" असा सवाल उपस्थित करत नागरिकांनी, संतांच्या शिकवणीचा बुरखा पांघरून अशा प्रकारे कायदा हातात घेणाऱ्यांमुळे वारकरी परंपरेचे पावित्र्य मलिन होत असल्याची खंत व्यक्त केली आहे. त्यातच काही स्थानिक राजकीय पुढाऱ्यांकडून आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप स्थानिकांमधून होत असून, जर अशा आरोपीवर तात्काळ कारवाई झाली नाही तर परिसरात सामाजिक स्वास्थ्य बिघडेल आणि इतर गंभीर घटना घडतील, अशी तीव्र भीती व्यक्त केली जात आहे.
सुकेळी येथील रहिवासी असलेल्या २३ वर्षीय फिर्यादी महिला कामावरून घरी परतल्यानंतर, त्यांच्या साडेतीन वर्षांच्या लहान मुलाला मारहाण झाल्याच्या कारणावरून त्या विचारणा करण्यास गेल्या असता हा संपूर्ण प्रकार घडला होता. स्वतःला महाराज म्हणवणाऱ्या जितेंद्र धामणसे याने वादात उडी घेत फिर्यादी महिलेला मारहाण केली. त्यानंतर त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांनीही महिलेवर हात उचलला. स्थानिकांनी वाद मिटवल्यानंतर आरोपींनी फिर्यादीच्या घरासमोर येऊन जातीवाचक विधाने करत जीवे मारण्याची धमकी दिली होती.
या प्रकरणी नागोठणे पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला असून ऑडिओ क्लिपचे पुरावेही सादर करण्यात आले आहेत. मात्र गुन्हा दाखल होऊन दिवस उलटले तरी आरोपी अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. "वारकरी संप्रदाय हा समता, भूतदया आणि सदाचाराची शिकवण देतो; पण येथे स्वतःला वारकरी म्हणवणारा व्यक्ती एका असहाय्य महिलेवर हात उचलतो आणि जातीवाचक द्वेष ओकतो," अशा शब्दांत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.
स्थानिक नागरिक व सामाजिक संघटनांचा आरोप आहे की, राजकीय दबावापोटी आणि स्थानिक पुढारी आरोपीच्या मागे उभे राहत असल्यानेच पोलीस कारवाईत शिथिलता येत असल्याचा संशय बळावत आहे. आरोपी मोकाट राहिल्याने फिर्यादी कुटुंब प्रचंड दहशतीखाली जगत असून, आरोपीकडून भविष्यात पुन्हा कायदा हातात घेतला जाऊ शकतो आणि गावातील सामाजिक सलोखा बिघडू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राजकीय हस्तक्षेप बाजूला ठेवून नागोठणे पोलिसांनी आरोपीला तात्काळ बेड्या ठोकून गजाआड करावे, अशी जोरदार मागणी आता जोर धरू लागली आहे.

Comments
Post a Comment