मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या १२ बांगलादेशी घुसखोरांना हुसकावले! पोलीय अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव 🚨

सुकेळीतील महिला मारहाण व ॲट्रॉसिटी प्रकरणातील 'त्या' तथाकथित महाराजासह आरोपी अद्यापही मोकाट

आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी

पोलिसांच्या भूमिकेकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष


रोहा-रायगड, दि. १३ (विशेष प्रतिनिधी) :- रोहा तालुक्यातील सुकेळी येथे लहान मुलांच्या क्षुल्लक वादातून एका आदिवासी समाजातील महिलेला बेदम मारहाण करत भररस्त्यात जातीवाचक हीन पातळीवर शिवीगाळ करणाऱ्या तथाकथित वारकरी महाराजासह त्याच्या कुटुंबातील चौघांवर नागोठणे पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गंभीर गुन्हा दाखल होऊनही आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. नित्यनेमाने वारी आणि हरिपाठ करून स्वतःला समाजप्रबोधक भासवणाऱ्या व्यक्तीचा हा हिंसक आणि विकृत चेहरा उघडकीस आल्यानंतरही पोलिसांकडून आरोपींना तात्काळ अटक का केली जात नाही, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात असून सर्वच स्तरांतून आरोपींवर कडक कारवाई करत तात्काळ बेड्या ठोकण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, सुकेळी येथील रहिवासी असलेल्या २३ वर्षीय फिर्यादी महिला नोकरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. गेल्या १९ ऑगस्ट रोजी रात्री कामावरून परतल्यानंतर त्यांच्या लहान मुलाला मारहाण झाल्याच्या कारणावरून त्या विचारणा करण्यास गेल्या असता, स्वतःला 'महाराज' म्हणून घेणाऱ्या जितेंद्र चंद्रकांत धामणसे याने घराबाहेर येत फिर्यादी महिलेची मान पकडून बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याचा मुलगा जिवेश, पत्नी सविता आणि आई चंद्रभागा यांनीही महिलेवर धावून जात मारहाण सुरू केली. प्रत्यक्षदर्शी ग्रामस्थांनी वाद सोडवल्यानंतर आरोपींनी फिर्यादीच्या घरासमोर येऊन 'आदिवासी कातकरी आम्हाला शिकवायला आली, हिला मारायला नव्हे तर जाळायला पाहिजे' अशा अत्यंत विकृत शब्दांत सर्वांसमोर शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.

​या घटनेनंतर सुरुवातीला पोलिसांनी केवळ अदखलपात्र (NCR) नोंद केली होती. मात्र, फिर्यादीने हार न मानता रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. घटनेची ऑडिओ क्लिप पेनड्राइव्हद्वारे पुरावा म्हणून दिल्यानंतर अखेर जितेंद्र धामणसे, जिवेश धामणसे, सविता धामणसे व चंद्रभागा धामणसे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (ॲट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला. कायद्यानुसार अशा गुन्ह्यात आरोपींना तात्काळ अटक करण्याचे थेट अधिकार पोलिसांना असताना आणि भक्कम पुरावे उपलब्ध असतानाही अद्याप कोणत्याही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.

​दरम्यान, आरोपींना तात्काळ अटक न झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा रायगड जिल्हा एकलव्य आदिवासी संघटनेचे जिल्हा सचिव रामभाऊ कोळी यांनी दिला आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांनी दिलेले बलिदान विसरून आदिवासी समाजाला हीन लेखणाऱ्या अशा विकृत मनोवृत्तीच्या लोकांवर कायद्याचा बडगा उगारणे गरजेचे आहे, अशी भावना समाजात निर्माण झाली आहे. आता नागोठणे पोलीस या प्रकरणात मुख्य आरोपी जितेंद्र धामणसेसह इतर आरोपींना कधी गजाआड करतात, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

Comments

Popular posts from this blog