मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या १२ बांगलादेशी घुसखोरांना हुसकावले! पोलीय अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव 🚨

सुकेळी ॲट्रॉसिटी प्रकरणाची 'एनडीएमजे' राष्ट्रीय संघटनेकडून गंभीर दखल!

राज्य सचिव वैभव गीते हे रायगड जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांची भेट घेणार; सामाजिक न्याय मंत्र्यांकडेही करणार पाठपुरावा


बेणसे-रायगड, दि. १३ सप्टेंबर (चंद्रकांत अडसुळे) :- रोहा तालुक्यातील सुकेळी येथे एका आदिवासी समाजातील महिलेला बेदम मारहाण करून जातीवाचक हीन पातळीवर शिवीगाळ केल्याप्रकरणी तथाकथित वारकरी महाराजासह चौघांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होऊनही आरोपी अद्याप मोकाट असल्याने या प्रकरणाचे तीव्र पडसाद आता राष्ट्रीय पातळीवर उमटू लागले आहेत. या गंभीर प्रकरणाची दखल 'नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस' (NDMJ) या नामांकित राष्ट्रीय संघटनेने घेतली असून संघटनेचे राज्य सचिव वैभव तानाजी गीते यांनी या प्रकरणात थेट मैदानात उतरण्याचा निर्धार केला आहे. आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी श्री. गीते हे येत्या दोन दिवसांत रायगडचे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच रोहा उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) यांची प्रत्यक्ष भेट घेणार आहेत. याशिवाय, हे प्रकरण केंद्र व राज्य शासनाकडे नेऊन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले आणि महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री ना. संजय शिरसाट यांनाही रीतसर निवेदन सादर करणार असल्याची माहिती वैभव गीते यांनी दिली आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता मोठे वळण मिळाले आहे.

​सुकेळी येथील रहिवासी असलेल्या २३ वर्षीय फिर्यादी महिला कामावरून घरी परतल्यानंतर, त्यांच्या साडेतीन वर्षांच्या लहान मुलाला शेजारील मुलीने खेळताना मारल्याच्या कारणावरून त्या विचारणा करण्यास गेल्या होत्या. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या आणि परिसरात 'महाराज' म्हणून वावरणाऱ्या जितेंद्र चंद्रकांत धामणसे याने वादात मध्यस्थी केली. 'आमच्या बायकांच्या भांडणात पडू नका' असे फिर्यादीने म्हटल्याचा राग मनात धरून, नित्यनेमाने वारी आणि हरिपाठ करणाऱ्या जितेंद्र धामणसे याने घराबाहेर येत फिर्यादी महिलेची मान पकडून मारहाण केली. त्यानंतर त्याचा मुलगा जिवेश, पत्नी सविता आणि आई चंद्रभागा यांनीही महिलेवर धावून जात मारहाण केली. स्थानिक ग्रामस्थांनी वाद सोडवल्यानंतर आरोपींनी फिर्यादीच्या घरासमोर येऊन 'आदिवासी कातकरी आम्हाला शिकवायला आली, हिला मारायला नव्हे तर जाळायला पाहिजे' अशा अत्यंत विकृत शब्दांत सर्वांसमोर जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली होती.

​या घटनेनंतर सुरुवातीला पोलिसांनी केवळ अदखलपात्र (NCR) नोंद केली होती. मात्र, फिर्यादीने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे दाद मागितल्यानंतर आणि पेनड्राईव्हमधील ऑडिओ क्लिपचे सबळ पुरावे सादर केल्यानंतर नागोठणे पोलीस ठाण्यात जितेंद्र धामणसे, जिवेश धामणसे, सविता धामणसे व चंद्रभागा धामणसे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेसह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (ॲट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र गुन्हा दाखल होऊन अनेक दिवस उलटले तरी नागोठणे पोलिसांनी एकाही आरोपीला अटक केलेली नाही. यावरून आदिवासी व वंचित घटकांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून रायगड जिल्हा एकलव्य आदिवासी संघटनेनेही यापूर्वीच आंदोलनाचा इशारा दिलेला आहे.

​आता या लढ्यात 'नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस' (NDMJ) ही राष्ट्रीय संघटना उतरल्यामुळे पोलीस प्रशासनावरील दबाव प्रचंड वाढला आहे. राज्य सचिव वैभव तानाजी गीते यांनी स्पष्ट केले आहे की, पीडित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी आणि मोकाट फिरणाऱ्या तथाकथित वारकरी महाराजासह सर्व आरोपींना तात्काळ गजाआड करण्यासाठी संघटना प्रशासकीय पातळीवर सर्वतोपरी पाठपुरावा करेल. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि रोहा उपविभागीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन तातडीने कारवाईची मागणी केली जाईल, तसेच केंद्रीय मंत्री ना. रामदास आठवले व राज्याचे सामाजिक न्याय मंत्री ना. संजय शिरसाट यांच्याकडे दाद मागून या प्रकरणात कडक पावले उचलण्यास भाग पाडले जाईल. त्यामुळे आता प्रशासन यावर काय कारवाई करते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Comments

Popular posts from this blog