मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या १२ बांगलादेशी घुसखोरांना हुसकावले! पोलीय अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव 🚨

सातारा पोलीस दलाचा ‘नारीशक्ती’ उपक्रम उत्साहात

५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची उपस्थिती, आत्मसंरक्षणाचे दिले धडे


​सातारा, दि. ४ (प्रतिनिधी) :- ‘महिला सुरक्षित तरच समाज सुरक्षित राहील’ हा उदात्त विचार केंद्रस्थानी ठेवून सातारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘नारीशक्ती : महिला सुरक्षित तर समाज सुरक्षित’ या विशेष जनजागृती व प्रशिक्षण उपक्रमाला जिल्ह्यातील विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमात ५ हजारांहून अधिक मुला-मुलींनी एकत्र येत आत्मसंरक्षणाचे महत्त्व जाणून घेतले. पोलीस प्रशासनाने राबविलेल्या या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, यामुळे युवतींमध्ये सुरक्षिततेची आणि स्वावलंबनाची एक नवी ऊर्जा निर्माण झाली आहे.



​सदर उपक्रमाची संकल्पना सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्षात साकारण्यात आली. आजच्या गतिमान युगात प्रत्येक युवतीने स्वतःच्या सुरक्षेबाबत सजग व सक्षम असणे अत्यंत गरजेचे आहे. केवळ कायद्याची भीती दाखवून सुरक्षित समाज निर्माण होत नाही, तर समाजात वावरताना महिलांमध्ये निर्भयता निर्माण होणे अधिक आवश्यक आहे, या उद्देशातून या भव्य कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.



​या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे भारतातील पहिल्या महिला ॲक्शन डायरेक्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शैला टिके-कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांची उपस्थिती ठरली. शैला टिके-कुलकर्णी व त्यांच्या टीमने विद्यार्थिनींना संकटाच्या क्षणी सुरक्षित कसे राहावे, याविषयी अत्यंत उपयुक्त अशा विविध स्वरक्षण तंत्रांचे (सेल्फ डिफेन्स) थेट प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण दिले. अचानक उद्भवणाऱ्या प्रसंगांना शारीरिक व मानसिक बळाने कसे तोंड द्यायचे, विपरीत परिस्थितीत स्वतःची सुटका कशी करून घ्यायची, याचे बारकावे त्यांनी उपस्थितांना समजावून सांगितले.

​स्वरक्षण म्हणजे केवळ शारीरिक ताकद किंवा मारामारी नसून, त्यामागे असणारे प्रसंगावधान, मानसिक कणखरता, आत्मसन्मान आणि संकटाच्या वेळी अचूक निर्णय घेण्याची क्षमता अत्यंत महत्त्वाची ठरते, असा मोलाचा संदेश या प्रशिक्षणातून देण्यात आला. कोणत्याही कठीण प्रसंगात घाबरून न जाता ‘मी स्वतःचे रक्षण स्वतः करण्यास पूर्णपणे समर्थ आहे’ असा अढळ आत्मविश्वास प्रत्येक विद्यार्थिनीच्या मनात रुजविणे, हाच या विशेष उपक्रमाचा मूळ हेतू राहिला आहे. 'स्वरक्षण शिका, आत्मविश्वास वाढवा आणि एक सुरक्षित समाज घडवा' या संदेशाने संपूर्ण परिसर भारावून गेला होता. उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी या वेळी स्वरक्षणाचे धडे गिरवत स्वतःच्या व समाजाच्या सुरक्षिततेसाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला.

Comments

Popular posts from this blog