रोहा एस.टी. बसस्थानकाच्या विश्रांतीगृहातून झोपेत असलेल्या एस.टी. कर्मचाऱ्यांचा मुद्देमाल लंपास!
अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
रोहा-रायगड, दि. २३ (प्रतिनिधी) :- रोहा येथील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (एस.टी.) बसस्थानकाच्या उघड्या विश्रांतीगृहात मुक्कामी झोपलेल्या एस.टी. कर्मचाऱ्यांचा ३२ हजार ९०० रुपये किमतीचा ऐवज अज्ञात चोरट्याने शिताफीने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात भारतीय न्याय संहितेनुसार चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सार्वजनिक बसस्थानक परिसरातील प्रवाशांसह कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, मूळचे आर्वी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे येथील रहिवासी असलेले फिर्यादी एस.टी. कर्मचारी हे आपल्या सहकारी चालक व वाहकासह कर्तव्यानिमित्त रोहा येथे आले होते. रात्रीची सेवा संपल्यानंतर विश्रांतीसाठी ते रोहा एस.टी. बसस्थानक परिसरातील उघड्या विश्रांतीगृहामध्ये झोपले होते. सर्व कर्मचारी गाढ झोपेत असल्याची संधी साधून मध्यरात्रीच्या सुमारास दबा धरून बसलेल्या अज्ञात चोरट्याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी फिर्यादी व त्यांच्या सहकाऱ्यांचा रोख रक्कम व मौल्यवान वस्तू असा एकूण ३२ हजार ९०० रुपये किमतीचा मुद्देमाल फिर्यादींच्या संमतीशिवाय चोरून नेला. पहाटे जाग आल्यानंतर कर्मचाऱ्यांना आपली बॅग व मुद्देमाल गायब असल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने आजूबाजूला शोध घेतला असता कोणतीही माहिती न मिळाल्याने अखेर त्यांनी रोहा पोलीस ठाण्यात धाव घेऊन रीतसर फिर्याद नोंदवली.
या घटनेप्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर २९९/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बसस्थानकासारख्या गजबजलेल्या आणि महत्त्वाच्या ठिकाणी अशा प्रकारे कर्मचाऱ्यांचाच माल चोरीला गेल्याने एसटी कर्मचाऱ्यांमध्ये तसेच प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या गुन्ह्याचा पुढील अधिक तपास पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजू खंडवी हे करत असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयित आरोपीचा माग काढण्याचे काम पोलिसांकडून वेगाने सुरू आहे.

Comments
Post a Comment