पोलिसाचा प्रामाणिकपणा
खारपाडा येथे विसरलेली सोन्याच्या दागिन्यांची बॅग प्रवाशाला सुरक्षित परत
पेण-रायगड, दि. १७ (प्रतिनिधी) :- मुंबईहून कोकणाकडे प्रवास करणाऱ्या एका कुटुंबाची मौल्यवान दागिन्यांची बॅग रस्त्यात गहाळ झाल्यानंतर, कर्तव्यावर असलेल्या एका पोलीस अंमलदाराने दाखवलेल्या कर्तव्यदक्षतेमुळे आणि प्रामाणिकपणामुळे ही बॅग संबंधित कुटुंबीयांना सुखरूप परत मिळाली आहे. पोलीस हवालदाराच्या या संवेदनशील आणि तत्पर कार्यपद्धतीचे सर्व स्तरांतून मोठे कौतुक होत आहे.
धारावी, मुंबई येथील रहिवासी सुमित पाथरे हे १६ सप्टेंबर रोजी आपल्या कुटुंबासमवेत चिपळूणच्या दिशेने प्रवास करत होते. प्रवासादरम्यान मौजे खारपाडा परिसरात थांबले असता, त्यांची मौल्यवान सोन्याचे दागिने असलेली प्रवासी बॅग नजरचुकीने तेथेच विसरली. काही अंतर पुढे गेल्यावर बॅग सोबत नसल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले, ज्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आणि कुटुंबात प्रचंड घबराट निर्माण झाली. दरम्यानच्या काळात, खारपाडा परिसरात कर्तव्यावर तैनात असलेले पोलीस हवालदार सतीश पाटील यांना ही बेवारस बॅग आढळून आली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून हवालदार पाटील यांनी कोणताही मोह न बाळगता तात्काळ वरिष्ठांना या प्रकाराची माहिती दिली.
त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ती बॅग सुरक्षितपणे दादर सागरी पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली. इकडे दागिन्यांची बॅग विसरल्याची खात्री पटताच पाथरे कुटुंबीयांनी तत्काळ खारपाड्याच्या दिशेने धाव घेतली. त्यांनी दादर सागरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधून आपली कैफियत मांडली. पोलिसांनी बॅगमधील दागिन्यांची आणि इतर साहित्याची खात्रीशीर पडताळणी केली. कुटुंबीयांनी दाखवलेली ओळख पटल्यानंतर, ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सर्व मौल्यवान सोन्याचे दागिने आणि बॅग सुमित पाथरे यांच्या स्वाधीन करण्यात आली. गहाळ झालेले दागिने सुखरूप परत मिळाल्याने पाथरे कुटुंबीयांनी पोलिसांचे मनापासून आभार मानले, तर हवालदार सतीश पाटील यांच्या या प्रामाणिक कर्तव्यामुळे 'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' या ब्रीदवाक्याला पुन्हा एकदा रायगड पोलिसांनी सार्थ ठरवले आहे.

Comments
Post a Comment