नागपूर शहर पोलिसांची धडक कारवाई!
७० लाखांचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत करून मूळ मालकांना केला परत
नागपूर, दि. २ (प्रतिनिधी) :- नागपूर शहर पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यांवर कडक अंकुश ठेवत नागरिकांच्या सुरक्षेसोबतच त्यांचा खाकीवरील विश्वास अधिक दृढ करणारी मोठी कामगिरी बजावली आहे. विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून चोरीला गेलेला एकूण ६९ लाख ५७ हजार ५८३ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी कौशल्याने हस्तगत करून एका विशेष कार्यक्रमात त्याच्या खऱ्या हक्कदारांना परत केला आहे. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या गतिमान व कार्यक्षम मार्गदर्शनाखाली पोलिसांनी राबविलेल्या या विशेष मोहिमेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड समाधान व्यक्त होत असून नागपूर पोलिसांच्या या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
गेल्या काही महिन्यांत शहराच्या वेगवेगळ्या भागांतून मोबाईल, दुचाकी तसेच सोन्या-चांदीच्या दागिन्यांची चोरी झाल्याच्या तक्रारी विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झाल्या होत्या. या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी गुन्हे शाखा व संबंधित पोलीस ठाण्यांना गुन्हेगारांचा कसून शोध घेऊन नागरिकांचा मुद्देमाल लवकरात लवकर हस्तगत करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने गुन्हे शाखा आणि स्थानिक तपास पथकांनी तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहिती आणि ठोस तपासाच्या आधारे कारवाई करत संशयित आरोपींना जेरबंद केले. आरोपींकडून तब्बल १७२ मौल्यवान मोबाईल फोन, १५ नग सोन्या-चांदीचे दागिने आणि ११ दुचाकी वाहने असा एकूण सुमारे ६९ लाख ५७ हजार रुपयांपेक्षा अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष मेळाव्यात हा जप्त केलेला मुद्देमाल मूळ मालकांना सन्मानपूर्वक परत सोपवण्यात आला. कुणासाठी हा मोबाईल अत्यंत महत्त्वाचा संपर्क दुवा आणि डेटाचा स्रोत होता, कुणासाठी आयुष्यभराच्या कष्टाने जोडलेले सोन्या-चांदीचे दागिने होते, तर कुणासाठी ही दुचाकी रोजच्या रोजीरोटीचे साधन होती. चोरीला गेलेल्या वस्तू परत मिळतील अशी आशा सोडून दिलेल्या नागरिकांना जेव्हा आपली मालमत्ता सुरक्षितपणे परत मिळाली, तेव्हा अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. नागरिकांनी नागपूर पोलिसांच्या कार्यक्षमतेचे आभार मानत पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या नेतृत्वाखालील पोलीस दलावर भरभरून विश्वास व्यक्त केला. नागरिकांची सुरक्षा, सेवा आणि विश्वास हीच नागपूर पोलिसांची खरी ओळख असून ही मोहीम यापुढेही अशीच अविरत सुरू राहील, असा विश्वास यावेळी पोलीस प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला.

Comments
Post a Comment