मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या १२ बांगलादेशी घुसखोरांना हुसकावले! पोलीय अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव 🚨

कफ परेड पोलिसांची मोठी कारवाई!

८०० देशी दारूच्या बाटल्यांसह तिघांना अटक

विनापरवाना मद्य साठवून विकणाऱ्या टोळीला खाकीचा दणका!


​मुंबई, दि. ९ (प्रतिनिधी) :- कफ परेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या देशी दारूची विक्री करणाऱ्या अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून तिघांना रंगेहाथ बेड्या ठोकल्या आहेत. या धडक कारवाईत पोलिसांनी तब्बल ८०० देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या असून, जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे १ लाख ३२ हजार रुपये इतकी आहे.

​कफ परेड पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक प्रशांत नेरकर हे आपल्या पथकासह ८ सप्टेंबर रोजी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. यादरम्यान, जगन्नाथ भोसले मार्ग, फायर ब्रिगेडच्या मागे, कफ परेड येथे काही इसम बेकायदेशीरपणे देशी दारूची साठवणूक करून तिची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती पोलीस उपनिरीक्षक नेरकर यांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ सापळा रचून संबंधित ठिकाणी अचानक छापा टाकला. या छाप्यादरम्यान घटनास्थळावर तिघे जण संशयास्पदरीत्या दारूची विक्री करताना पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी तातडीने तिघांनाही मुद्देमालासह ताब्यात घेतले. त्यांच्याकडे दारू विक्रीचा कोणताही अधिकृत परवाना किंवा कागदपत्रे आहेत का, याबाबत कसून चौकशी केली असता त्यांच्याकडे कोणताही परवाना मिळून आला नाही.

​त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरून ९० मिली क्षमतेच्या संत्रा देशी दारूच्या एकूण ८०० प्लास्टिक सीलबंद बाटल्या असा एकूण १ लाख ३२ हजार रुपयांचा बेकायदेशीर मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलिसांनी गणेश शिवकुमार मेनेन (वय ४० वर्षे, रा. रूम नंबर ३१७, गीता नगर, डॉ. होमी भाभा रोड, कफ परेड), मनीगंडा नागराज स्वामी (वय ३५ वर्षे, रा. झोपडी नंबर ३७६, गीता नगर, डॉ. होमी भाभा रोड, कफ परेड) आणि सुधीर महेंदर चक्रवर्ती (वय ३८ वर्षे, रा. रूम नंबर १५६, गीता नगर, डॉ. होमी भाभा रोड, कफ परेड) या तिघांना अटक करून कफ परेड पोलीस ठाण्यात आणले व त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

​ही धडक कामगिरी पोलीस उपायुक्त (दक्षिण परिमंडळ ०१), सहाय्यक पोलीस आयुक्त (कुलाबा विभाग), कफ परेड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद गायकवाड आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनंत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रशांत नेरकर (गुन्हे प्रकटीकरण अधिकारी)  पोलीस हवालदार पाटील, पोलीस हवालदार फड, पोलीस हवालदार खामकार तसेच पोलीस शिपाई पाथरूट आणि पोलीस शिपाई जाधव या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली असून, याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Comments

Popular posts from this blog