मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या १२ बांगलादेशी घुसखोरांना हुसकावले! पोलीय अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव 🚨

कोलाड-पुणे मार्गावर भीषण अपघात

ब्रेक फेल झाल्याने कंटेनर थेट खोल दरीत कोसळला

५ तासांच्या थरारक रेस्क्यू ऑपरेशननंतर चालकासह दोघांना जीवनदान


कोलाड-रायगड, दि. १७ (भिवा पवार) :- कोलाड-पुणे मार्गावरील पहूर फाटा ते वाळंजवाडी गावच्या हद्दीत शंकर मंदिराजवळ बुधवार, १६ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी भीषण अपघाताची घटना घडली आहे. सुतारवाडी बाजुकडून कोलाडच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रेलर कम मालवाहू कंटेनरचे अचानक ब्रेक फेल झाल्याने हा कंटेनर रस्त्याखाली थेट तब्बल ४० फूट खोल दरीमध्ये कोसळला. या भीषण दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहनातील चालक गंभीर अडकून पडला होता, तर क्लीनर किरकोळ जखमी झाला. घटनेनंतर कोलाड 'एस.व्ही.आर.एस.एस.' (SVRSS) रेस्क्यू टीम, कोलाड पोलीस आणि येरुणकर क्रेन सर्व्हिस यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत तब्बल ५ तास सलग अथक बचावमोहीम राबवून दरीत अडकलेल्या चालकाची सुखरूप सुटका केली असून या संयुक्त प्रयत्नांना मोठे यश आले आहे.  



​याबाबत मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, ट्रेलर कंटेनर क्रमांक आर.जे. ०९ जी.एफ. १४३७ हा सुतारवाडीकडून कोलाडच्या दिशेने जात होता. दरम्यान, पहूर फाटा ते वाळंजवाडी गावाच्या दरम्यान शंकर मंदिराच्या परिसरात आला असता वाहनाचा अचानक ब्रेक निकामी झाला. ब्रेक फेल झाल्याचे निदर्शनास येताच चालकाचे वाहनावरील संपूर्ण नियंत्रण सुटले आणि हा अवजड कंटेनर थेट रस्त्यावरून खाली दरीत कोसळला. अपघातानंतर क्लीनर कमलेश गिरीधर रावत (वय २० वर्षे, रा. उदयगड, ता. बिनॉय, जि. अजमेर, राजस्थान) हा प्रसंगावधान राखून वाहनातून बाहेर पडल्याने त्याला किरकोळ दुखापत झाली; मात्र चालक सोनु भालचंद्र रावत (वय ३५ वर्षे, रा. उदयगड, ता. बिनॉय, जि. अजमेर, राजस्थान) हा केबिनमध्ये गंभीर अवस्थेत अडकून पडला होता.  

​घटनेची माहिती मिळताच कोलाड पोलीस, SVRSS रेस्क्यू टीम आणि येरुणकर क्रेन सर्व्हिस घटनास्थळी दाखल झाले. रेस्क्यू टीमने तातडीने दरीत उतरून पाहणी केली असता, हा अवजड कंटेनर तब्बल ४० फूट खोल दरीत कोसळल्याचे आणि तिथे एका झाडाच्या आधारावर अत्यंत धोकादायक व नाजूक स्थितीत अडकल्याचे भीषण वास्तव समोर आले. वाहनाची स्थिती इतकी बिकट होती की, जराशीही हालचाल झाल्यास तो कंटेनर झाडाचा आधार सुटून आणखी खाली सुमारे ५०० फूट खोल दरीत कोसळण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती.

​या अत्यंत थरारक व आव्हानात्मक परिस्थितीत चालकाला बाहेर काढण्यासाठी अत्यंत नियोजनबद्ध, अचूक आणि अत्यंत जोखमीचे रेस्क्यू ऑपरेशन हाती घेण्यात आले. सर्वात आधी कंटेनरला येरुणकर क्रेनच्या सहाय्याने त्याच जागी सुरक्षितपणे स्थिर करण्यात आले, जेणेकरून पुढील अनर्थ टळेल. त्यानंतर प्रत्येक टप्प्यावर सुरक्षा व्यवस्थेची खात्री करून रेस्क्यू पथकाचे जवान मोठ्या काळजीपूर्वक दरीत अडकलेल्या चालकापर्यंत पोहोचले. तब्बल ५ तासांच्या अथक आणि शर्थीच्या प्रयत्नांनंतर गंभीर जखमी चालकाला सुखरूप बाहेर काढण्यात टीमला मोठे यश आले.

​अपघातातील जखमी चालक सोनु रावत आणि क्लीनर कमलेश रावत या दोघांनाही तातडीने उपचारासाठी आंबेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र (ता. रोहा) येथे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर आवश्यक वैद्यकीय उपचार करण्यात आले आहेत. या संपूर्ण मोहिमेदरम्यान SVRSS रेस्क्यू टीम, कोलाड पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि येरुणकर क्रेन सर्व्हिस यांनी जिवाची बाजी लावून, एकमेकांशी अचूक समन्वय साधत चालकाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले, ज्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून मोठे कौतुक होत आहे. या अपघाताची नोंद कोलाड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, कोलाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बी. बी. फार्णे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एस. एस. अधिकारी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Comments

Popular posts from this blog