खोपोलीत सायबर भामट्याची मोठी हातसफाई!
मोबाईल हॅक करून बँक खात्यातून तब्बल १५ लाख रुपये लंपास
खोपोली पोलिसांत गुन्हा दाखल
खोपोली-रायगड, दि. ६ (प्रतिनिधी) :- मोबाईल फोनचा अनधिकृतपणे ॲक्सेस मिळवून आणि बँक खात्यातील गोपनीय माहिती व ओटीपी परस्पर मिळवून एका नागरिकाच्या खात्यातून तब्बल १५ लाख रुपये परस्पर लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार खोपोलीत उघडकीस आला आहे. या प्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या हायटेक चोरीचा कसून तपास करत आहेत.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, खालापूर तालुक्यातील खोपोली येथील शिळफाटा परिसरातील रुशीवन रिसॉर्टच्या बाजूला असलेल्या 'रिव्हेर इस्टेट' मधील फ्लॅट क्रमांक डी-२०३ येथे राहणाऱ्या फिर्यादी नागरिकाकडे ओपो ए ५ २०२० (Oppo A5 2020) कंपनीचा मोबाईल हँडसेट आहे. एका अज्ञात सायबर भामट्याने फिर्यादी यांच्या या मोबाईल हँडसेटमध्ये कोणत्याही पूर्वपरवानगीशिवाय अनधिकृतपणे तांत्रिक प्रवेश मिळवला. मोबाईलचा संपूर्ण ॲक्सेस स्वतःच्या नियंत्रणात घेतल्यानंतर आरोपीने फिर्यादी यांच्या मोबाईलवर येणारे बँकेचे सर्व गोपनीय वन टाईम पासवर्ड (ओटीपी) परस्पर स्वतःकडे वळवून घेतले.
फिर्यादी यांचे बँक ऑफ इंडियामध्ये खाते असून, या खात्याचा ताबा मिळवल्यानंतर आरोपीने फिर्यादीच्या बँक खात्यातून अत्यंत चलाखीने पैसे काढण्यास सुरुवात केली. आरोपीने एकाच वेळी मोठी रक्कम न काढता संशय येऊ नये म्हणून प्रत्येकी ५,००० रुपयांचे तब्बल ३०० वेळा डेबिट ट्रान्झॅक्शन्स केले. अशा प्रकारे सलग ३०० व्यवहारांद्वारे एकूण १५ लाख रुपयांची भलीमोठी रक्कम आरोपीने स्वतःच्या बँक ऑफ इंडियाच्या खात्यात वळती करून घेतली आणि फिर्यादीची प्रचंड मोठी आर्थिक फसवणूक केली. खात्यातून टप्प्याटप्प्याने मोठी रक्कम कमी झाल्याचे आणि मोबाईलचा ताबा दुसऱ्याकडे गेल्याचे लक्षात येताच फिर्यादीने तत्काळ पोलिसांत धाव घेतली.
या गंभीर आर्थिक फसवणुकीप्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ३१०/२०२६ नुसार माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० (२००८ च्या सुधारणेसह) चे कलम ६५ (क) आणि ६५ (ड) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हायटेक गुन्ह्याचा पुढील सखोल तपास खोपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक करत असून आरोपीचे बँक तपशील आणि तांत्रिक पुरावे गोळा करण्याचे काम वेगाने सुरू आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांनी आपल्या मोबाईल व डिजिटल सुरक्षिततेबाबत अधिक सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Comments
Post a Comment