खोपट ते अलिबाग प्रवासादरम्यान प्रवाशी महिलेच्या बॅगेतील २ लाख ६३ हजारांचा मुद्देमाल लंपास
अलिबाग पोलिसांत गुन्हा दाखल
अलिबाग-रायगड, दि. १ (प्रतिनिधी) :- खोपट (ठाणे) एस.टी. स्टँड ते अलिबाग दरम्यान 'शिवाई' बसने प्रवास करणाऱ्या एका महिला प्रवाशाच्या बॅगेतून अज्ञात चोराने हातसफाई करत सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि मोबाईल असा एकूण २ लाख ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, फिर्यादी महिला व त्यांचे पती हे खोपट (ठाणे) येथील एस.टी. स्टँडवरून अलिबागसाठी निघालेल्या शिवाई बसने प्रवास करत होते. अलिबाग येथे पोहोचल्यानंतर ते दोघेही आपल्या बेलोशी (ता. अलिबाग) या मूळगावी गेले. घरी पोहोचल्यानंतर त्यांनी सोबत आणलेली बॅग तपासली असता, बॅगेमध्ये सुरक्षित ठेवलेले सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि मोबाईल फोन गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. प्रवासादरम्यान गर्दीचा किंवा प्रवाशांच्या दुर्लक्षाचा गैरफायदा घेऊन कोणीतरी अज्ञात इसमाने लबाडीच्या इराद्याने, फिर्यादी यांच्या नकळत बॅग उघडून हा ऐवज स्वतःच्या फायद्यासाठी चोरून नेल्याची खात्री पटली.
आपल्या बॅगेतील सुमारे २ लाख ६३ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे लक्षात येताच फिर्यादी यांनी तत्काळ अलिबाग पोलीस ठाण्यात धाव घेऊन रीतसर तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे अलिबाग पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर १४४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०५(सी) प्रमाणे चोरीचा गुन्हा नोंदवला आहे. या चोरीच्या घटनेमुळे प्रवाशांमध्ये काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, बस प्रवासात प्रवाशांनी आपल्या मौल्यवान सामानाची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या प्रकरणाचा पुढील अधिक तपास पोलीस हवालदार आंबेतकर करत आहेत.

Comments
Post a Comment