खालापूर येथील श्री स्वामी समर्थ मठात धाडसी चोरी!
चांदीच्या आवरणासह पादुका लंपास, दीड लाखांहून अधिकचा मुद्देमाल चोरीला
खालापूर-रायगड, दि. ४ (प्रतिनिधी) :- खालापूर परिसरातील श्री स्वामी समर्थ मठामध्ये भरदिवसा चोरीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मठाचा उघडा दरवाजा पाहून आत प्रवेश करत दोन अज्ञात चोरट्यांनी स्वामी समर्थांच्या लाकडी पादुका आणि त्यावर असलेले मौल्यवान चांदीचे आवरण चोरून नेल्याची घटना घडली आहे. या धाडसी चोरीमुळे खालापूर परिसरातील भाविकांमध्ये तीव्र संताप आणि खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, खालापूर हद्दीत असलेल्या श्री स्वामी समर्थ मठामध्ये नेहमीप्रमाणे दैनंदिन पूजाअर्चा आणि भाविकांची ये-जा सुरू होती. दरम्यान, मठाचा मुख्य दरवाजा उघडा असल्याचे पाहून दबा धरून बसलेल्या दोन अज्ञात इसमांनी आत प्रवेश केला. परिसराची टेहळणी केल्यानंतर फिर्यादी अथवा मठातील कोणाचेही लक्ष नसल्याची संधी साधून या चोरट्यांनी लबाडीच्या उद्देशाने मठातील पूजनीय लाकडी पादुका आणि त्यावर बसवलेले चांदीचे आवरण असा एकूण १ लाख ६० हजार ५२२ रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. मठातील पादुका जागेवर नसल्याचे लक्षात येताच व्यवस्थापक व भाविकांची एकच तारांबळ उडाली. तातडीने आजूबाजूला शोध घेण्यात आला, मात्र चोरटे हाती लागले नाहीत.
या प्रकरणी तात्काळ खालापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. फिर्यादीच्या तक्रारीवरून खालापूर पोलिसांनी अज्ञात दोन आरोपींविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर ३८२/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३०३ अन्वये चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे. मठासारख्या पवित्र आणि श्रद्धास्थानावरून देवाच्या पादुकांचीच चोरी झाल्याने नागरिकांमधून चोरट्यांचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास पोलीस उपनिरीक्षक हाके करत असून चोरट्यांच्या मागावर पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.

Comments
Post a Comment