मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या १२ बांगलादेशी घुसखोरांना हुसकावले! पोलीय अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव 🚨

रिक्षात विसरलेला किमती मोबाईल प्रवाशाला घरपोच देऊन बिरवाडीतील रिक्षाचालकाने जपली माणुसकी

रिक्षाचालक शशिकांत शेलार यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक


महाड-रायगड, दि. २९ (प्रतिनिधी) :- सध्याच्या धावपळीच्या आणि भौतिक सुखाच्या मागे लागलेल्या युगात अनेकदा माणुसकी हरवल्याची खंत व्यक्त केली जाते, मात्र प्रामाणिकपणा हा कोणत्याही पैशाने विकत घेता येत नसून तो रक्तातच असावा लागतो, याची प्रचिती देणारी एक अत्यंत कौतुकास्पद घटना बिरवाडी परिसरात समोर आली आहे. 

गुरव परिवारातील श्री. शशिकांत गुरव यांचे पाहुणे मुंबईहून भावे येथे जात असताना बिरवाडी येथे अत्यंत महत्त्वाचा व महागडा मोबाईल फोन ते रिक्षात विसरले. त्यानंतर प्रामाणिक रिक्षाचालक शशिकांत शेलार यांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता स्वतः प्रवाशाच्या घरी पोहोचवून सुपूर्द केला आहे. त्यांच्या या निस्वार्थी कार्यामुळे परिसरामध्ये त्यांच्या प्रामाणिकपणाची जोरदार चर्चा सुरू असून सर्वच स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.  

​याबाबत सविस्तर वृत्त असे की, मुंबईहून आलेले संबंधित प्रवासी बिरवाडी येथे पोहोचल्यानंतर पुढील प्रवासासाठी भावे येथे जाण्याकरिता शशिकांत शेलार यांच्या रिक्षात बसले होते. प्रवासादरम्यान घाईगडबडीत आणि सामानाची आवराआवर करताना त्यांचा मौल्यवान मोबाईल फोन चुकून रिक्षाच्या सीटवरच राहिला. प्रवासी आपल्या घरी सुखरूप पोहोचले, मात्र काही वेळाने मोबाईल जवळ नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. आजच्या डिजिटल काळात मोबाईलमध्ये केवळ संपर्क क्रमांकच नव्हे, तर बँक खात्यांचे तपशील, महत्त्वाचे कागदपत्रे आणि वैयक्तिक माहिती साठवलेली असते. त्यामुळे तो मोबाईल गहाळ झाल्याचे समजताच संबंधित प्रवाशाची मोठी तारांबळ उडाली आणि संपूर्ण कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. सर्वत्र शोधाशोध करूनही फोन न मिळाल्याने ते प्रचंड अस्वस्थ झाले होते.  

​दरम्यान, प्रवाशाला इच्छित स्थळी सोडून पुढील प्रवासासाठी जात असताना रिक्षाचालक शशिकांत शेलार यांचे लक्ष रिक्षाच्या मागील सीटवर पडलेल्या मोबाईलवर गेले. तो फोन नुकत्याच प्रवास करून गेलेल्या प्रवाशाचाच आहे हे त्यांच्या तात्काळ लक्षात आले. आजच्या काळात अनेकदा अशा मौल्यवान वस्तू सापडल्यानंतर लोकांची नियत बदलते, मात्र शेलार यांनी कसलाही मोह अथवा लालुच मनात न बाळगता क्षणाचाही विलंब न लावता तातडीने निर्णय घेतला. त्यांनी तात्काळ आपली रिक्षा पुन्हा फिरवून प्रवाशाचे घर गाठले आणि तो मोबाईल थेट प्रवाशाच्या हातात सुपूर्द केला.  

​अचानक घरासमोर रिक्षा उभी राहून रिक्षाचालकाने स्वतः येऊन तो हरवलेला मौल्यवान फोन सुपूर्द केल्याचे पाहून प्रवाशाला व त्यांच्या कुटुंबीयांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला. प्रवाशाने सुटकेचा निःश्वास सोडत शशिकांत शेलार यांच्या पाया पडून त्यांचे हात जोडून आभार मानले. कष्टाची कमाई आणि प्रामाणिक वृत्ती हीच खरी श्रीमंती असते, हे शेलार यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. त्यांच्या या कर्तव्यदक्ष व निस्वार्थी सेवेमुळे समाजातील माणुसकीवरील आणि प्रामाणिकपणावरील विश्वास अधिक दृढ झाला असून इतर सर्व रिक्षाचालकांसाठी व नागरिकांसाठी त्यांचे हे वर्तन दीपस्तंभासारखे प्रेरणादायी ठरले आहे. बिरवाडी व भावे पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी शेलार यांच्या या प्रामाणिकपणाचे मनापासून कौतुक केले आहे.

Comments

Popular posts from this blog