मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या १२ बांगलादेशी घुसखोरांना हुसकावले! पोलीय अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव 🚨

फिर्यादीनेच रचला घरफोडीचा बनाव

६ लाख ६० हजारांचे दागिने लंपास करणाऱ्या तक्रारदाराला रायगड पोलिसांकडून बेड्या

 घरचाच कारटा निघाला चोरटा! 


नागोठणे, दि. २१ (महेंद्र माने) :- आर्थिक अडचणीतून सुटका मिळवण्यासाठी चक्क स्वतःच्याच घरात चोरी करून कुटुंबीयांची दिशाभूल करणाऱ्या आणि पोलिसांत घरफोडीची खोटी तक्रार दाखल करणाऱ्या एका भामट्या फिर्यादीचे बिंग फोडण्यात रायगड पोलिसांना मोठे यश आले आहे. पेण तालुक्यातील आंबेराई-बेणसे येथील या संशयित तक्रारदाराने सुमारे ६ लाख ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने स्वतःच लपवून ठेवत अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केल्याचा बनाव रचला होता. मात्र, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (एलसीबी) आणि नागोठणे पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या काही वेळातच या प्रकरणाचा छडा लावून फिर्यादी आरोपीला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून चोरीस गेलेले सर्व दागिने हस्तगत केले आहेत.

​या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, दीपक रामचंद्र भुरे (रा. आंबेराई, पो. बेणसे, ता. पेण) याने शनिवार, ५ सप्टेंबर रोजी नागोठणे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार, शुक्रवार ४ सप्टेंबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या उत्सवासाठी तो व त्याची आई घराला कुलूप लावून गेले होते. उत्सव संपल्यानंतर घरी परतले असता, घराच्या बेडरूममधील कपडे अस्ताव्यस्त पडलेले दिसले तसेच लोखंडी कपाटासह लाकडी ड्रॉव्हर उघडे होते. कपाटात पत्नीने ठेवलेले सोन्याचे दागिने गायब होते आणि स्वयंपाकघरातील बाथरुमच्या खिडकीच्या काचा काढून, पोटमाळ्यावरील लाकडी खिडकी तोडून अज्ञात चोरट्यांनी ही चोरी केल्याचा दावा त्याने केला होता. या फिर्यादीवरून नागोठणे पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३०५ (अ), ३३१ (३) आणि ३३१ (४) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता.

​गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून या प्रकरणाचा तपास सहायक फौजदार संदेश सानप यांच्याकडे सोपवण्यात आला. त्याचवेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अलिबागचे पोलीस उपनिरीक्षक सुरज पाटील व त्यांचे पथक आणि नागोठणे पोलीस पथकाने घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. तपासादरम्यान संशयित हालचाली आणि घटनास्थळावरील परिस्थिती पाहता पोलिसांना फिर्यादीच्या वागणुकीवर संशय आला. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणासह गुप्त बातमीदारांकडून माहिती गोळा करून दीपक भुरे याची सखोल चौकशी केली असता, त्याने आर्थिक विवंचनेतून स्वतःच्याच घरातील आई व पत्नीचे दागिने चोरून लपवून ठेवल्याची आणि पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी खोटा बनाव केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून १२ तोळे वजनाची सोन्याची गंथन, २ तोळे वजनाचा सोन्याचा सर, २ तोळे वजनाची सोन्याची चैन, ३ तोळे वजनाची दुसरी सोन्याची चैन आणि ३ तोळे वजनाचा सोन्याचा हार असा एकूण ६ लाख ६० हजार रुपये किमतीचा सर्व मुद्देमाल हस्तगत केला आहे.

​सदरची उल्लेखनीय कामगिरी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे, रोहा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रसाद गोकुळे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तर नागोठणे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुरज पाटील, पोलीस हवालदार विनोद पाटील, शाम जयसिंग कराडे तसेच पोलीस कॉन्स्टेबल विक्रांत बंधनकर व बाली पुतेवाड यांनी या तपासात महत्त्वाची भूमिका बजावली. अल्पावधीतच या बनावट घरफोडीचा पर्दाफाश केल्याबद्दल नागोठणे शहर व परिसरातून पोलिसांचे मोठे कौतुक होत आहे.

​दरम्यान, सणासुदीच्या व सुट्ट्यांच्या काळात नागरिकांनी घराबाहेर पडताना विशेष खबरदारी बाळगावी, असे आवाहन रायगड पोलिसांनी केले आहे. बाहेरगावी जाताना घरात रोख रक्कम अथवा मौल्यवान दागिने न ठेवता ते बँकेच्या लॉकरमध्ये ठेवावेत, तसेच प्रवासाला निघताना आपल्या विश्वासातील शेजाऱ्यांना कल्पना द्यावी जेणेकरून ते घराकडे लक्ष ठेवू शकतील. आपल्या परिसरातील मुख्य प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत आणि रात्रीच्या वेळी घराभोवती व मुख्य दरवाज्याजवळ पुरेसा प्रकाश ठेवावा. परिसरात कोणीही संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तत्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात अथवा '११२' या पोलीस हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, तसेच घरात काम करणारे नोकर, चालक, सुरक्षारक्षक किंवा भाडेकरू ठेवण्यापूर्वी त्यांची पोलिसांमार्फत चारित्र्य पडताळणी करून घ्यावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog