अमराठी ऑटोरिक्षा व टॅक्सी चालकांच्या मराठी ज्ञानाची अलिबाग, पोयनाड येथे तपासणी!
परिवहन विभागाची धडक कारवाई
अलिबाग-रायगड, दि. २४ (स्वप्निल नाईक) :- महाराष्ट्र शासनाच्या परिवहन आयुक्तांच्या निर्देशानुसार राज्यातील अमराठी भाषिक ऑटोरिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेचे जुजबी ज्ञान असणे अनिवार्य करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर उप प्रादेशिक परिवहन कार्यालय (पेण) अंतर्गत अलिबाग आणि पोयनाड परिसरामध्ये अमराठी भाषिक चालकांच्या मराठी ज्ञानाची पडताळणी करण्यासाठी विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली.
राज्यातील सर्व परप्रांतीय व अमराठी ऑटोरिक्षा तसेच टॅक्सी चालकांना मराठी भाषेचे जुजबी ज्ञान (Working Knowledge of Marathi Language) आत्मसात करण्यासाठी प्रशासनाकडून १५ ऑगस्ट २०२६ पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली होती. ही मुदत संपल्यानंतर प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून चालकांच्या भाषिक ज्ञानाची खातरजमा करण्यासाठी परिवहन विभागाने ही मोहीम हाती घेतली.
पेण उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सिद्धार्थ ठोके यांच्या मार्गदर्शनाखाली वायुवेग पथकाने ही कारवाई पार पाडली. या मोहिमेत मोटार वाहन निरीक्षक रोहित कारवार, सहायक मोटार वाहन निरीक्षक अक्षय तुपसमुद्रे, गुलाब सोलंकी तसेच चालक सचिन गायकवाड यांच्या पथकाने अलिबाग व पोयनाड येथील विविध ऑटोरिक्षा थांब्यांना प्रत्यक्ष भेटी दिल्या. याशिवाय नियमित वाहन तपासणीदरम्यान चालकांना थांबवून त्यांच्या मराठी भाषेच्या संभाषणाची आणि आकलनाची तपासणी करण्यात आली. प्रवाशांशी संवाद साधताना मराठी भाषेचा वापर होतो की नाही, याबाबतही माहिती घेण्यात आली.
परिवहन विभागाच्या या अचानक झालेल्या तपासणी मोहिमेमुळे अमराठी वाहनधारकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. प्रवाशांशी सुलभ संवाद व्हावा आणि स्थानिक भाषेचा सन्मान राखला जावा यासाठी शासनाने हा नियम लागू केला असून, अमराठी भाषिक ऑटोरिक्षा व टॅक्सी चालकांनी मराठी भाषेचे जुजबी ज्ञान प्राप्त करण्याकडे गांभीर्याने लक्ष देणे आता अत्यंत गरजेचे बनले आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही अशाच प्रकारची कडक कारवाई सुरू राहणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.



Comments
Post a Comment