मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या १२ बांगलादेशी घुसखोरांना हुसकावले! पोलीय अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव 🚨

वरप येथे घरावर छापा टाकून १२ हजार रूपयांपेक्षा अधिक किमतीचा अवैध गांजा जप्त!

 वडखळ पोलिसांची धडक कारवाई 


​वडखळ-रायगड, दि. ११ (प्रतिनिधी) :- रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील मौजे वरप येथे वडखळ पोलीस ठाण्याच्या पथकाने अंमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई करत एक मोठा छापा टाकला आहे. वरप येथील रहिवासी असलेल्या एका वृद्धाच्या घरातील शेडवर अचानक टाकलेल्या छाप्यात पोलिसांना मोठ्या प्रमाणावर गांजा हा अंमली पदार्थ हस्तगत करण्यात यश आले आहे. या कारवाईमुळे परिसर आणि परिसरात बेकायदेशीर अंमली पदार्थांची खरेदी-विक्री करणाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

​मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, ११ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास सुमारे १.०५ वाजण्याच्या दरम्यान वडखळ पोलिसांना वरप, तालुका पेण, पोस्ट पाबळ, जिल्हा रायगड येथील एका निवासी घराजवळील शेडमध्ये बेकायदेशीररीत्या गांजा बाळगून त्याची विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत छापा टाकला. या कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपी लक्ष्मण महादु मनवे (वय ७८ वर्षे, रा. वरप, ता. पेण, जि. रायगड) याच्या राहत्या घराच्या शेडमधून बेकायदेशीररीत्या बाळगलेला अंमली पदार्थ जप्त केला. यामध्ये २४५ ग्रॅम वजनाचा काळपट व हिरवट रंगाची पाने, फुले, फळे, बोंड आणि काळ्या ओलसर वनस्पतीसदृश उग्र वास असणारा गांजा हस्तगत करण्यात आला. या जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थाची बाजारभावानुसार एकूण किंमत १२,२५० रुपये इतकी आहे.  

​आरोग्यास घातक असणारा आणि मानवी शरीरावर गंभीर विपरीत परिणाम करणारा हा अंमली पदार्थ आरोपीने स्वतःच्या वैयक्तिक आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीरपणे विक्री करण्याच्या उद्देशाने आपल्या ताब्यात बाळगल्याचे तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी वडखळ पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार नितेश वर्सेत घासे (वय ३९ वर्षे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी लक्ष्मण महादु मनवे याच्याविरोधात गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ (एनडीपीएस ॲक्ट) च्या कलम ८(क) आणि २०(ब)(अ) अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक १०५/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कायदेशीर प्रक्रियेनुसार आरोपीला भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNS) कलम ३५(३) अन्वये नोटीस बजावण्यात आली आहे.  

​ही संपूर्ण धडक कारवाई पेण विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. नालकुल आणि वडखळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय जाधव यांच्या पथकाने सहाय्यक फौजदार कांबळे, HC ढेणे, HC कोंडे, HC देसाई, HC गायकवाड, HC घासे, PC ठाकूर या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय जाधव हे करत असून, आरोपी हा गांजा कोणाकडून खरेदी करत होता आणि यामागे आणखी कोणाचे रॅकेट सक्रिय आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत. पोलिसांच्या या तत्पर कारवाईबद्दल स्थानिक नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात असून अंमली पदार्थ विक्रेत्यांविरोधात अशीच कडक मोहीम सुरू ठेवण्याची मागणी करण्यात येत आहे.

Comments

Popular posts from this blog