ताम्हिणी घाटात महिलेचा गळा आवळून खून
दरीत मृतदेह फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन आरोपींना माणगाव पोलिसांकडून अटक
माणगाव-रायगड, दि. २८ (प्रतिनिधी) :- पुणे-माणगाव मार्गावरील ताम्हिणी घाट परिसरातील कोंडेथर गावच्या हद्दीत एका अज्ञात महिलेचा गळा आवळून खून करून तिचा मृतदेह खोल दरीत फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी माणगाव पोलिसांनी तत्परतेने तपास चक्रे फिरवून अवघ्या २४ तासांच्या आत दोन संशयित आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, २५ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास कोंडेथर गावच्या हद्दीत रस्त्याच्या कडेला सुमारे २० फूट खोल दरीतील झाडाझुडपात एक महिला अत्यंत गंभीर व बेशुद्धावस्थेत मिळून आली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत स्थानिक नागरिकांच्या मदतीने संबंधित महिलेला बाहेर काढून उपचारासाठी माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणीअंती दुपारी ४:१० वाजता तिला मृत घोषित केले. माणगाव उपजिल्हा रुग्णालयात मृतदेह ठेवण्यासाठी शीतगृह (कोल्ड स्टोरेज) उपलब्ध नसल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पुढील कार्यवाहीसाठी पनवेल उपजिल्हा रुग्णालयाचे रेफर लेटर दिले. त्यानंतर मृतदेह पनवेल उपजिल्हा रुग्णालयात हलवून तेथे शवविच्छेदन करण्यात आले.
वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या पोस्टमार्टम रिपोर्टनुसार आणि ॲडव्हान्स डेथ सर्टिफिकेटच्या नोंदीवरून संबंधित महिलेचा मृत्यू गळा आवळल्यामुळे (Ligature Strangulation) झाल्याचे स्पष्ट झाले. यावरून अज्ञात आरोपींनी अज्ञात कारणावरून सदर महिलेचा ओढणीने गळा आवळून जीव जाईपर्यंत दाबून तिची निर्घृण हत्या केली आणि खुनाचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचा मृतदेह ताम्हिणी घाटातील खोल दरीमध्ये फेकून दिल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) आणि २३८ अन्वये खुनाचा व पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला (गु.र.नं. २४५/२०२६). घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने तपास करत २६ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री १०:२८ वाजता या गुन्ह्यातील दोन आरोपींना शिताफीने ताब्यात घेऊन अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, हत्येमागील नेमके कारण काय तसेच मयत महिलेची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील अधिक तपास पोलीस निरीक्षक मारुती आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव पोलीस करत आहेत.

Comments
Post a Comment