श्रीवर्धन तालुक्यातील शिस्ते येथे घरफोडी!
खिडकीवाटे घरात शिरून ५२ हजार रुपयांची रोकड लंपास
श्रीवर्धन, दि. २० (प्रतिनिधी) :- तालुक्यातील शिस्ते येथे मध्यरात्रीच्या सुमारास एका घरावर चोरट्यांनी डल्ला मारत ५२ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दिघी सागरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिस्ते येथील एका महिलेच्या राहत्या घरी दिनांक १७ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही चोरीची घटना घडली. घरातील सर्व सदस्य गाढ झोपेत असताना अज्ञात चोरट्याने घराच्या किचन रूममधील खिडकीवाटे बेडरूममध्ये प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील भिंतीवर असलेल्या लाकडी खुंटीला टांगून ठेवलेल्या काळ्या रंगाच्या बॅगेतून ५२ हजार रुपयांची रोकड चोरून अज्ञात चोरटा पसार झाला. सकाळी हा प्रकार लक्षात आल्यानंतर फिर्यादी महिलेने तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.
या घटनेप्रकरणी दिघी सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १०३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३०५ व ३३१(४) प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक भास्कर गच्चे या प्रकरणाचा पुढील तपास करत असून अज्ञात आरोपीचा कसून शोध घेतला जात आहे.

Comments
Post a Comment