मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या १२ बांगलादेशी घुसखोरांना हुसकावले! पोलीय अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव 🚨

अल्पवयीन मुलींची छेड काढणाऱ्या विकृताला सातारा पोलिसांकडून बेड्या!

६० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपी जेरबंद


​सातारा, दि. २८ (प्रतिनिधी) :- शहरात अल्पवयीन मुलींची छेडछाड करून रस्त्यावर महिला व मुलींसमोर अश्लील चाळे करणाऱ्या एका इसमाला सातारा शहर पोलिसांनी अत्यंत शिताफीने अटक केली आहे. विनोद मोहन कामटे (वय ४० वर्षे, सध्या रा. सैदापूर, जि. सातारा, मूळ रा. जातेगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्या या विकृत कृत्यामुळे परिसरात निर्माण झालेले भीतीचे वातावरण आता संपुष्टात आले आहे.

​सातारा शहर आणि परिसरातील रस्त्यांवरून ये-जा करणाऱ्या शाळकरी मुली, अल्पवयीन तरुणी तसेच महिलांसमोर अश्लील वर्तन करून त्यांची छेड काढण्याच्या घटना समोर येत होत्या. या गंभीर प्रकाराची दखल घेत सातारा शहर पोलिसांनी तातडीने तपासचक्रे फिरवली. सातारा शहर गुन्हे प्रकटीकरण (डी.बी.) पथकाने परिसरातील सुमारे ६० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज बारकाईने तपासले. या तपासणीदरम्यान संशयित व्यक्तीच्या मोटारसायकलचा अर्धवट क्रमांक निष्पन्न झाला. त्या अर्धवट नंबर प्लेटच्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तसेच स्थानिक खबऱ्यांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या मदतीने पोलिसांनी सापळा रचून आरोपी विनोद कामटे याला सैदापूर परिसरातून ताब्यात घेतले.

​पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर सातारा शहर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला रीतसर अटक करण्यात आली आहे. या क्लिष्ट गुन्ह्याचा अत्यंत जलद गतीने छडा लावल्याबद्दल सातारा शहर डी.बी. पथकाचे सर्व स्तरांतून मोठे कौतुक होत आहे.

​सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, पोलीस अंमलदार निलेश जाधव, निलेश यादव, विक्रम माने, प्रविण कडव, पंकज मोहिते, तुषार भोसले, सागर गायकवाड, मच्छिंद्रनाथ माने, सुहास कदम, सुशांत कदम, वैभव माने, संतोष घाडगे आणि सचिन रिटे यांच्या पथकाने पार पाडली.

​दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी मुलींनी अथवा महिलांनी कोणत्याही अनुचित घटनेला किंवा पाठलाग करणाऱ्या विकृतांना न घाबरता तात्काळ आपल्या पालकांना, शिक्षकांना किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच पालकांनीही पाल्यांच्या तक्रारींकडे गांभीर्याने लक्ष देऊन संशयास्पद प्रकार निदर्शनास येताच पोलिसांशी संपर्क साधावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog