सातारा जिल्ह्यात म्हसवड व पुसेगाव पोलिसांचा बेशिस्त वाहनचालक आणि रोड रोमिओंवर दणका!
१ लाख ४ हजारांचा दंड वसूल तर १६ सायलन्सर व १२ प्रेशर हॉर्न जप्त
सातारा, दि. २४ (प्रतिनिधी) :- जिल्ह्यात सुरक्षित प्रवास आणि शांतता राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष नाकाबंदी मोहीम हाती घेतली असून, म्हसवड आणि पुसेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेशिस्त वाहनचालक, कर्कश सायलन्सर लावणारे व एसटी स्टँड-कॉलेज परिसरात फिरणाऱ्या रोड रोमिओंवर धडक कारवाई करण्यात आली आहे. या दोन्ही कारवायांमध्ये मिळून मोटार वाहन कायद्यान्वये एकूण १४७ केसेस दाखल करत तब्बल १ लाख ४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
म्हसवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत २२ ऑगस्ट २०२६ रोजी शिंगणापूर चौक परिसरात विशेष नाकाबंदी राबविण्यात आली होती. या मोहिमेदरम्यान कॉलेज व एसटी स्टँड परिसरातील रोड रोमिओ आणि वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या बेशिस्त चालकांवर कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्यात आली. म्हसवड पोलिसांनी एकूण ८० केसेस नोंदवून ५६ हजार रुपयांचा दंड वसूल केला, तसेच वाहनांना धोकादायक व आवाजाची मर्यादा ओलांडणारे कर्कश सायलन्सर बसवल्याप्रकरणी १० सायलन्सर आणि ६ प्रेशर हॉर्न जप्त करून कारवाईचा बडगा उगारला. ही उल्लेखनीय कामगिरी सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडकर, दहिवडी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसवडचे प्रभारी अधिकारी संदीप पोमण, वाहतूक पोलीस अंमलदार पोपट चव्हाण, युवराज खाडे, राहुल थोरात तसेच पोलीस अंमलदार प्रकाश इंदलकर, विकास ओंबासे व संतोष काळे यांच्या पथकाने पार पाडली.
दुसऱ्या कारवाईत पुसेगाव पोलीस ठाण्याच्या पथकाने विसापूर फाटा व शिवाजी चौक येथे विशेष नाकाबंदी लावून रस्त्यावर फटाके वाजवणारे सायलन्सर वापरणाऱ्या रोड रोमिओ आणि बेशिस्त चालकांवर जोरदार कारवाई केली. पुसेगाव पोलिसांनी एकूण ६७ केसेस नोंदवत ४८ हजार रुपयांचा दंड वसूल केला. यासोबतच कर्णकर्कश आवाज करणाऱ्या ६ वाहनांचे सायलन्सर व ६ प्रेशर हॉर्न जप्त करत रोड रोमिओंचे चांगलेच धाबे दणाणले. ही कारवाई पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडकर, कोरेगावच्या उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जनार्दन पाटील, पोलीस उपनिरीक्षक शेख, पोलीस उपनिरीक्षक शेख अलीशेर, वाहतूक पोलीस अंमलदार संतोष बागल, बापूराव नद्रे, राहुल जायभाय व अविनाश घाडगे यांनी केली.
सातारा जिल्हा पोलीस दलातर्फे बेशिस्त चालकांवर आणि शांततेचा भंग करणाऱ्यांवर अशी कारवाई पुढेही अविरत सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले असून सर्व नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे व सुरक्षित प्रवास करावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Comments
Post a Comment