सातारा पोलीस दलातर्फे १ ते ३ सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यातील मुलींसाठी भव्य स्वसंरक्षण जनजागृती मोहीम
मुलगी सुरक्षित, समाज सुरक्षित!
सातारा, दि. ३० (प्रतिनिधी) :- जिल्ह्यातील मुलींमध्ये स्वसंरक्षणाचे महत्त्व रुजवून त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी तसेच महिला सुरक्षिततेबाबत व्यापक जनजागृती घडवून आणण्यासाठी सातारा पोलीस दलाच्या वतीने 'मुलगी सुरक्षित, समाज सुरक्षित!' या विशेष जिल्हाव्यापी जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. १ ते ३ सप्टेंबर २०२६ या कालावधीत हा उपक्रम कराड, सातारा, वाई आणि फलटण येथील विविध नामांकित शिक्षण संस्थांमध्ये सलग राबविला जाणार आहे.
सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून ही विशेष मोहीम आखण्यात आली आहे. आजच्या काळात मुलींचे सक्षमीकरण आणि सुरक्षा ही काळाची गरज बनली असून, मुलींनी प्रत्येक प्रसंगाला धैर्याने सामोरे जावे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या मोहिमेत भारताच्या पहिल्या महिला ॲक्शन डायरेक्टर सौ. शैला टिके कुलकर्णी या विद्यार्थिनींना थेट संवाद साधत स्वसंरक्षणाचे तंत्र, शारीरिक सक्षमता, त्वरित निर्णयक्षमता आणि मानसिक आत्मविश्वासाचे प्रत्यक्ष धडे देणार आहेत.
या तीन दिवसीय जिल्हाव्यापी उपक्रमाचे नियोजन अत्यंत सुटसुटीत पद्धतीने करण्यात आले आहे. अभियानाची सुरुवात १ सप्टेंबर २०२६ रोजी कराड येथून होणार असून सकाळी १०:३० ते १२:३० या वेळेत 'एसजीएम कॉलेज' आणि दुपारी २:०० ते ४:०० या वेळेत 'महिला महाविद्यालय' येथे हे सत्र पार पडेल. त्यानंतर २ सप्टेंबर २०२६ रोजी साताऱ्यामध्ये सकाळी १०:३० ते १२:३० दरम्यान 'यशोदा अभियांत्रिकी महाविद्यालय' आणि दुपारी २:०० ते ४:०० या वेळेत 'धनंजय गाडगीळ कॉलेज ऑफ कॉमर्स' येथे विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले जाईल. मोहिमेच्या शेवटच्या दिवशी, म्हणजेच ३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०:३० ते १२:३० या वेळेत वाई येथील 'कन्याशाळा' आणि दुपारी ३:०० ते सायंकाळी ५:०० या वेळेत फलटण येथील 'मुधोजी हायस्कूल' येथे या विशेष सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.
समाजातील प्रत्येक घटक सुरक्षित राहावा आणि मुलींना निर्भयपणे वावरता यावे यासाठी सातारा पोलिसांनी उचललेले हे पाऊल अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जात आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थिनींमध्ये स्वसंरक्षणाचे कौशल्य व नवी ऊर्जा निर्माण होणार असून, संबंधित परिसरातील सर्व शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थिनींनी व नागरिकांनी या मोहिमेचा लाभ घेऊन सुरक्षित समाज घडविण्याच्या संकल्पात सहभागी व्हावे, असे आवाहन सातारा पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments
Post a Comment