केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदकाने रायगडचे अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे सन्मानित!
उत्कृष्ट तपासकार्याबद्दल राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या हस्ते पदक प्रदान
रायगड पोलीस दलात आनंदाचे वातावरण
रोहा-रायगड, दि. ९ (प्रतिनिधी) :- रायगड पोलीस दलाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा सुवर्णतुरा रोवला गेला असून जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक श्री. अभिजीत शिवथरे यांना त्यांच्या उत्कृष्ट तपासकौशल्य, अद्वितीय कर्तव्यनिष्ठा आणि उल्लेखनीय सेवेची दखल घेत अत्यंत प्रतिष्ठेच्या 'केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक' (अन्वेषण) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याच्या मा. पोलीस महासंचालकांच्या हस्ते एका विशेष समारंभात त्यांना हा गौरव प्रदान करण्यात आला.
अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे यांनी आपल्या कार्यकाळात अनेक गंभीर, किचकट आणि गुंतागुंतीच्या गुन्ह्यांचा अत्यंत अचूक व कौशल्याने तपास करून ते धसास लावले आहेत. कठीण प्रसंगातही अत्यंत संयमाने, आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करत आणि कायद्याच्या चौकटीत राहून त्यांनी गुन्हेगारांना बेड्या ठोकण्याचे मोलाचे कार्य केले आहे. त्यांच्या या निष्कलंक सेवा, अथक परिश्रम आणि गुणवत्तापूर्ण अन्वेषणाची (तपासकार्याची) वरिष्ठ पातळीवर तसेच केंद्रीय स्तरावर योग्य दखल घेतली गेली आहे. हे पदक म्हणजे त्यांनी पोलीस दलासाठी दिलेल्या समर्पित योगदानाची आणि उच्च दर्जाच्या कर्तव्यनिष्ठेची दिलेली एक गौरवशाली पावतीच आहे. केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदकासारखा सर्वोच्च सन्मान प्राप्त झाल्यामुळे रायगड पोलीस दलाचे नाव पुन्हा एकदा राज्यभरात उंचावले असून, या ऐतिहासिक यशामुळे संपूर्ण पोलीस दलामध्ये अत्यंत आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पाहावयास मिळत आहे. हा सन्मान केवळ वैयक्तिक नसून संपूर्ण रायगड पोलीस दलासाठी अत्यंत अभिमानाची आणि प्रेरणादायी बाब ठरली आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल रायगड पोलीस अधीक्षक, विविध वरिष्ठ पोलीस अधिकारी, सहकारी कर्मचारी तसेच सर्वसामान्य नागरिकांकडून अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे यांच्यावर अभिनंदनाचा आणि कौतुकाचा प्रचंड वर्षाव होत आहे.

Comments
Post a Comment