पोलादपूर तालुक्यातील कणगुले येथे घरफोडी!
१ लाख ३५ हजारांचे सोन्याचे दागिने व रोखड लंपास
पोलादपूर-रायगड, दि. २९ (प्रतिनिधी) :- तालुक्यातील मौजे कणगुले येथील एका बंद घराचे किचनमधील खिडकीचे ग्रिल उचकटून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करत १ लाख ३५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलादपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात खळबळ उडाली आहे.
या घटनेबाबत मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, मौजे कणगुले येथील महिला फिर्यादी या दिनांक १९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०:१५ वाजण्याच्या सुमारास घर बंद करून बाहेर गेल्या होत्या. त्यानंतर दिनांक २७ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०:१५ वाजेच्या सुमारास फिर्यादी घरी परतल्या असता हा चोरीचा प्रकार समोर आला. या दरम्यानच्या काळात अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या राहत्या घराच्या किचन रूमच्या स्लायडिंग खिडकीचे लोखंडी ग्रिल उपटून काढले आणि काच सरकवून घरात प्रवेश केला. त्यानंतर चोरट्याने बेडरूममध्ये जाऊन तेथील लोखंडी कपाटाची उचकापाचक केली. कपाटामध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा मिळून एकूण १ लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज चोरट्याने लबाडीच्या हेतूने चोरून नेला.
आपल्या घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी यांनी तत्काळ पोलादपूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. प्राप्त तक्रारीच्या आधारे पोलादपूर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर ९५/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५, ३३१(३) आणि ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून या प्रकरणाचा पुढील अधिक तपास सहाय्यक फौजदार श्री. जागडे करीत आहेत. भरदिवसा घडलेल्या या घरफोडीच्या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून चोरट्याचा तातडीने शोध घेण्याची मागणी केली जात आहे.

Comments
Post a Comment