मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या १२ बांगलादेशी घुसखोरांना हुसकावले! पोलीय अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव 🚨

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात! 

उभ्या ट्रेलरला बलेनो कारची जोरदार धडक

 दोघे गंभीर जखमी 


​नागोठणे-रायगड (महेंद्र माने) :- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर सुकेळी गावच्या हद्दीत, जिंदाल कंपनीसमोर पहाटेच्या सुमारास एक भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. महामार्गावर उभ्या असलेल्या एका ट्रेलरला पाठीमागून भरधाव बलेनो कारने जोरदार धडक दिली. या विचित्र अपघातामध्ये कारमधील दोघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले आहे.

​मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, चालक जयदीप दीपक महाडिक (वय ३६, रा. बोरीचा माळ, ता. ताळा, जि. रायगड) हे आपल्या ताब्यातील मारुती सुझुकी बलेनो कार (क्रमांक MH 05 FP 6255) घेऊन मुंबई बाजुकडून गोव्याच्या दिशेने जात होते. सोमवारी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास त्यांची कार सुकेळी येथील जिंदाल कंपनीच्या समोर आली असता, रस्त्यावर उभ्या असलेल्या टाटा कंपनीच्या ट्रेलरला (क्रमांक MH 46 CL 6349) पाठीमागून कारची भीषण धडक बसली. ही धडक इतकी जोरदार होती की कारच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. या अपघातात चालक जयदीप महाडिक तसेच त्यांच्या डाव्या बाजूला बसलेले स्वप्निल सुरेश साळुंखे (वय ३२, रा. इंदापूर-माणगाव) हे दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला व पायाला जबर दुखापत झाली आहे.

​अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस केंद्र वाकणचे ए.एस.आय. भानुदास म्हात्रे, पोलीस कॉन्स्टेबल सत्यवान पिंगळे, मनोहर माळी, राजू पाटील यांच्यासह नागोठणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे, पोलीस हवालदार महेश रूईकर, प्रशांत घरत, प्रशांत भोईर आणि पोलीस कॉन्स्टेबल बळी पुट्टेवाड यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोन्ही जखमींना तातडीने बाहेर काढून नागोठणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर दोघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी तात्काळ मुंबई येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळावरील अपघातग्रस्त वाहने बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली असून, या अपघाताचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे पोलीस करत आहेत.

Comments

Popular posts from this blog